

भाजप व शिवसेना युती तुटली नसल्याचा दावा दोन्हीही पक्षांचे नेते करीत असले तरी शिवसेनेने 26 प्रभागांत तब्बल 100हून अधिक ठिकाणी उमेदवार उभे करून भाजपपुढे थेट आव्हान उभे केले आहे. त्यामुळे आता जरी युतीचा निर्णय झाला तरी एवढ्या मोठ्या संख्येने एबी फॉर्म देऊन उभे केलेल्या उमेदवारांना अर्ज माघारी घेण्यासाठी मनधरणी करताना शिवसेनेबरोबरच भाजपच्या नेत्यांचा कस लागणार आहे. त्यामुळे युती होणार का आणि झाली तरी दोन्ही पक्षांतील किती उमेदवारांचे अर्ज मागे घेणे हे दोन्ही पक्षांसाठी मोठी डोकदुखी ठरणार आहे.
महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात भाजप-शिवसेना एकत्र येऊन निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू झाली. शिवसेनेने तब्बल 40 ते 45 जागांची मागणी भाजपकडे केली असताना भाजपने केवळ 10 जागा देण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे जागा वाटपाचे गुऱ्हाळ लांबले. अखेर सेनेच्या आक्रमक पवित्र्यानंतर भाजपने 15 जागांची तयारी दर्शविली. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसांपर्यंत त्यावर एकमत न झाल्याने भाजपने सर्वच्या सर्व जागांवर उमेदवार उभे केले.
तर शिवसेनेने जवळपास शंभरहून अधिक जागांवर एबी फॉर्म देऊन उमेदवार उभे केले. असे असताना शिवसेनेचे नेते उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मात्र युती तुटली नसल्याचा दावा केला आहे. याबाबत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चर्चा करून युतीच्या जागा वाटपाचा तिढा सोडवणार आहेत.
मात्र, आता युती झाली तरी ज्या जागांवर भाजप व शिवसेनेने एबी फॉर्म देऊन उमेदवार उभे केले आहेत, त्या सर्वांचे उमेदवारी अर्ज माघारी घेणे शक्य होणार का असा मोठा प्रश्न उभा राहिला. प्रामुख्याने भाजपला, शिवसेनेला सोडाव्या लागणाऱ्या जेमतेम 15 ते 20 जागांवरील उमेदवारांची माघारी करून घ्यावी लागणार आहे. शिवसेनेला मात्र तब्बल 80हून अधिक जागांवरील उमेदवारांचे अर्ज मागे घ्यावे लागतील. विशेष म्हणजे अर्ज माघारीची ही सर्व प्रक्रिया शुक्रवारी दुपारी 3 वाजेपर्यंत पूर्ण करावी लागेल. त्यामुळे दीड दिवसात दोन्ही पक्षातील शंभरहून अधिक जागांवरील उमेदवारी अर्ज माघारी घेणे मोठे अवघड होणार आहे. त्यामुळे आता युती झाली तरी उमेदवारांचे बाण सुटले आहेत. त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घ्यायचे असेल तर थेट पक्षाकडून सरसकट निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र देऊन उमेदवारी रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागेल.
शिवसेनेने उमेदवार उभे केलेले प्रभाग
प्रभाग क्र. 1, 3, 5, 6, 10, 11, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 24, 30, 32, 33, 34, 36, 37, 38, 39, 40, 41
राजकीय पक्षाकडून अधिकृत उमेदवार देताना एबी फॉर्म दिले जातात. त्यानुसार एखाद्या उमेदवाराला दिलेला एबी फॉर्म रद्द करण्याचा अधिकारही त्या पक्षाला असतो. त्यामुळे कोणत्या उमेदवाराचा एबी फॉर्म रद्द करण्याचा निर्णय संबंधित पक्ष घेऊ शकतो.
प्रसाद काटकर, निवडणूक निर्णय अधिकारी.