

धनकवडी: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारी अर्जावरून सुरू असलेली रस्सीखेच आता थेट मपळवा-पळवीफपर्यंत पोहोचली आहे. धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयात उमेदवारी अर्जांच्या छाननीदरम्यान, शिवसेना शिंदे गटाच्या एका उमेदवाराने दुसऱ्या उमेदवाराचा मूळ ‘एबी फॉर्म’ निवडणूक कर्मचाऱ्याच्या हातातून हिसकावून पळवल्याची धक्कादायक घटना घडली. या नाट्यमय प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. संबंधित उमेदवारावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी बुधवारी (दि. 31) धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक 36, 37 आणि 38 मधील अर्जांची छाननीप्रक्रिया सकाळी 11 वाजता सुरू झाली. प्रभाग क्रमांक 36 मअफमधील शिवसेना (शिंदे गट) उमेदवार मच्छिंद्र ढवळे यांच्या अर्जाची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली होती.
यावेळी याच प्रभागातील दुसरे उमेदवार उद्धव कांबळे यांनी छाननी कर्मचाऱ्याला ढवळे यांचा अर्ज पाहण्याची विनंती केली. कर्मचारी अर्ज दाखवणार इतक्यात, कांबळे यांनी अर्जाला जोडलेला मूळ ‘एबी फॉर्म’ कर्मचाऱ्याच्या हातातून हिसकावला आणि तिथून पळ काढला. छाननीच्या निमित्ताने क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात आणि सभागृहात उमेदवार व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती.
या गोंधळाचा फायदा घेत उद्धव कांबळे हे तो एबी फॉर्म घेऊन थेट बाथरूममध्ये पळाले आणि त्यांनी स्वतःला आतून कोंडून घेतले. महापालिका कर्मचारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी अर्जाचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही. अखेर कर्मचाऱ्यांनी आरडाओरडा करत पोलिसांना पाचारण केले.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कडक कारवाई
सरकारी कागदपत्रांची पळवा-पळवी केल्याचा हा गंभीर प्रकार लक्षात घेताच, निवडणूक निर्णय अधिकारी सुप्रिया करमरकर यांनी तातडीने पावले उचलली. त्यांनी संबंधित अर्ज पळवणाऱ्या उमेदवारावर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आता कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.