

सुनील माळी
आम्ही पुण्याचे लोक काय म्हणतो, हे ऐकून घ्यायला नानाविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना वेळच नसतो, पण आज पुण्याच्या महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा गोंधळ सुरू होण्याच्या बेतात असताना आणि नववर्षाचा सूर्य नुकताच उगवलेला असताना आमचं म्हणणं तुम्हाला ऐकून घेतलंच पाहिजे...
...तर ‘आम्ही भारताचे लोक’, या धर्तीवर ‘आम्ही पुण्याचे लोक’ तुम्हा सर्व राजकीय पक्षांना, त्यांच्या आजी-माजी-भावी लोकप्रतिनिधींना, त्यांच्या दिल्लीतल्या नेत्यांपासून ते गल्लीपर्यंतच्या अगदी तळागाळातल्या कार्यकर्त्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देऊ इच्छितो. हो, हो, अगदी सर्वांना... तुमच्यातील हिंदुत्ववादी भारतीय जनता पक्ष, शिवसेना (दोघा) आदी पक्षांना, धर्मनिरपेक्षतेचा टिळा लावलेल्या काँग््रेास, राष्ट्रवादी काँग््रेास (दोघा) पक्षांना आणि मधूनच अस्तित्त्व जाणवणाऱ्या समाजवादी-कम्युनिस्ट पक्षांनाही...
...आमच्या शुभेच्छा तुम्हा सर्वांना आहेत, पण त्या देताना त्यामागे एक अटही आहे... हो, आमच्या शुभेच्छा सशर्त आहेत. अगदी तुम्ही राजकीय पक्ष एकमेकांना जसा सशर्त पाठिंबा देता ना? त्याप्रमाणेच... आमची अट मात्र ऐकून घ्या... आमची अट एकच आहे, म्हटलं तर ती साधी-सोपी आहे आणि म्हटलं तर अवघडही. तुम्ही कोणत्याही पक्षाचे असा, तुम्ही कोणत्याही विचारसरणीचे असा, तुम्ही डावे असा का उजवे असा..., पण..., पण तुम्ही तुमच्या पक्षाच्या विचारसरणीला प्रामाणिक राहा. तुमच्या पक्षाची धोरणं, तुमच्या पक्षाने स्वीकारलेली तत्त्वप्रणाली तुम्हाला पटली म्हणूनच तर तुम्ही तुमच्या पक्षात आलात ना? तुमच्यापैकी काही जण हिंदुत्ववादाच्या पिंडानं जोपासले असतील तर काही जणांची मनोवृत्तीच धर्मनिरपेक्ष असेल, काही जणांना समाजवाद आपलासा वाटत असेल. तुमचा पिंड, तुमची मनोवृत्ती याला अनुकूल असलेल्या पक्षात काम करताना तुम्हाला कोण उत्साह येत होता आणि अजूनही येतो?... मग तुम्ही स्वीकारलेली तत्त्वप्रणाली आणि पक्ष यांना कोणत्याही व्यावहारिक तागडीत, तराजूत तोलू नका, त्याचं मोल लावू नका. अनुभव असा येतो की एखाद्या निवडणुकीत हार पत्करावी लागली, एखाद्या निवडणुकीत सत्तेपासून दूर राहावं लागलं तर तुमच्यापैकी अनेक जण सैरभैर होतात. सत्तेसाठी आपल्या पिंडाच्या विरोधी असलेल्या पक्षांशी हातमिळवणी करतात, किंवा काही जण तर त्या पक्षांत चक्क प्रवेशच करतात. हे पाहून आम्हा लोकांना खूप वेदना होतात...
एक लक्षात ठेवा..., निवडणुका येतील अन् जातील, तुमच्या पक्षाला एकामागून एक पराभव स्वीकारावा लागला तरी चालेल, एकामागून एक निवडणुका तुम्हाला महापालिकेत-विधानसभेत आणि अगदी लोकसभेत विरोधी बाकांवर बसावं लागलं तरी चालेल, पण सत्ता मिळत नाही, सत्तेपाठोपाठ येणारी पदं मिळत नाहीत, म्हणून निराश होऊन आपल्या तत्त्वांच्या विरोधातील पक्षाबरोबर हातमिळवणी करू नका, कधीच करू नका... कधी ना कधी तुम्ही मांडत असलेली तत्त्वं आम्हा पुणेकर लोकांना, मतदारांना पटतील, तुम्ही ती आम्हाला पटवून द्या. तुमच्या तत्त्वांनी आम्हा लोकांचं, आम जनतेचं भलं होणार आहे, याचा भरवसा आम्हाला येऊ द्या. तुमच्या या निष्ठापूर्वक तपश्चर्येनं आम्ही कधी ना कधी प्रसन्न होऊ. तुमच्या तत्त्वनिष्ठतेला कधी ना कधी फळ येईल.
...आपली तत्त्वं न सोडता प्रामाणिकपणे काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांबद्दल आम्हा लोकांना नेहमीच आदर वाटतो. अगदी कलेक्टर कचेरीसमोर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यासाठी आंदोलन करण्यासाठी किंवा आणखी कोणत्या तरी घटकाला न्याय मिळावा, म्हणून एखाद्या पक्षाचे अगदी दहा-पंधरा जणच एकत्र येतात, घोषणा देतात, तेव्हा त्याचं मोल व्यावहारिकदृष्ट्या काहीच नसतं, पण असं आंदोलन करणं आपलं कर्तव्य आहे, असं समजून एकत्र येणाऱ्या त्या मोजक्या टाळक्यांना आम्हा लोकांचा कायमच सलाम असतो. भराभर पक्ष बदलणाऱ्या, आपली निष्ठा विकून सत्ता विकत घेणाऱ्या अन् सत्तेच्या गुर्मीत, कार्यकर्त्यांच्या मुंग्यांच्या वारुळात राहणाऱ्या नेत्यांबद्दल आम्हा लोकांना मनातून आस्था नसतेच, असते ती अशा थोडक्या, अस्सल कार्यकर्त्यांबद्दल. मजग बदल घालून घाव, सांगून गेले मला भीमराव...फ अशा कलंदर वृत्तीनं अन्यायी सत्ता-धोरणांविरोधात आंदोलनाचे घाव घालणाऱ्या कार्यकर्त्यांचं मोल अमोल आहे...
तुम्ही सर्वच पक्षांच्या सर्वच कार्यकर्त्यांनी अस्सल जीणं जगावं, एवढीच आमची अट आहे..., ती पाळणाऱ्या सर्वांना आम्हा लोकांकडून नववर्षाच्या शुभेच्छा. नववर्षात उगवलेल्या सूर्याच्या तेजाप्रमाणं तुमच्या पक्षाला-विचारांना लखलखीत यश मिळो, एवढीच वर्षारंभी अपेक्षा आणि शुभेच्छा...
...एवढंच आज लोक तर म्हणतात...