

पुणे : महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून अर्जवाटप, प्रभागनिहाय बैठकांची मालिका आणि रणनीती ठरवण्याचे काम सुरू आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत आघाडी झाली तरीही स्वबळावर लढण्याच्या पर्यायासाठीही आम्ही पूर्णपणे तयार आहोत, अशी माहिती शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा शिंदे यांनी येथे पत्रकारांसमोर मांडला. या वेळी माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, ॲड. अभय छाजेड, गोपाळ तिवारी, संजय बालगुडे, दीप्ती चव्हाण, कमल व्यवहारे, लता राजगुरू, अविनाश बागवे आणि संग्राम खोपडे उपस्थित होते.
शिंदे यांनी सांगितले की, पक्षाकडे आतापर्यंत 211 अर्ज प्राप्त झाले असून, 13 डिसेंबरपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. काँग्रेसने प्रभागनिहाय घेतलेल्या बैठकींना चांगला प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाच्या सात प्रमुख बैठका झाल्या असून, वाटाघाटी, उमेदवारनिश्चिती, विविध समित्यांची स्थापना यामुळे निवडणूक कामाला गती मिळाली आहे. जिंकण्याची क्षमता आणि स्थानिक उमेदवारांना संधी दिली जाईल, असे शिंदे म्हणाले.
प्रत्येक प्रभागासाठी सक्षम उमेदवार आमच्याकडे उपलब्ध आहेत. स्वबळावर निवडणूक लढवण्याचीही आम्ही तयारी ठेवली आहे. मात्र, आघाडीबाबतचा अंतिम निर्णय प्रदेश समितीकडून होईल आणि पक्ष त्याचे पालन करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक ज्येष्ठ नेत्याला विधानसभा क्षेत्रांची जबाबदारी दिली आहे, असेही शिंदे म्हणाले.
प्रारूप मतदार याद्यांतील गैरप्रकाराबाबत बोलताना अविनाश बागवे म्हणाले की, दुबार नावे, मतदारांची नावे एका प्रभागातून दुसऱ्यात जाणे किंवा दुसऱ्या प्रभागातून आपल्या भागात येणे असे प्रकार वाढत असून, त्याद्वारे मतदार याद्यांचा गैरवापर सुरू आहे. भाजपने आपली यंत्रणा कामाला लावून व अधिकाऱ्यांना हाताशी धरून आपल्या सोयीने मतदार याद्या तयार केल्या आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर आयुक्तांनी कारवाई करावी. तसेच पुन्हा निर्दोष मतदार याद्या तयार कराव्यात असेही सांगितले.
महापालिकेतील प्रभाग रचना ते मतदार याद्यांपर्यंत मोठा गोंधळ सुरू आहे. भाजप महापालिकेच्या माध्यमातून निवडणुकांसाठी निधी उभारत आहे. मोठे आणि धोरणात्मक निर्णय नवीन सभागृहाकडून घेतले जाणे अपेक्षित असताना, अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि वृक्षगणनेच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. हा निधी भाजपच्या निवडणुकीसाठी वळवल्याचा संशय आहे, असा गंभीर आरोप शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केला आहे.