पुणे : गावागावांतील कुरघोड्यांमुळेच निरा नदीला प्रदूषणाचा विळखा!

नीरेतील प्रदुषणाने शेती आणि माणसाचे जगणे मुश्कील झाले आहे.
नीरेतील प्रदुषणाने शेती आणि माणसाचे जगणे मुश्कील झाले आहे.

पुढारी विशेष : अनिल तावरे

सांगवी : गावागावांतील गटातटाच्या कुरघोड्यांमुळेच निरा नदीच्या पाण्याला प्रदूषणाचा विळखा बसत आहे. एकमेकांची जिरवण्याच्या नादात नदीकाठच्या शेतीला धोका झाला आहे. शिरवली बंधाऱ्यातून होणाऱ्या गळतीमुळे बंधारा कोरडा पडण्याची शक्यता बळावली आहे.

शेती वाचविण्यासाठी सामूहिक लढ्याची गरज

दिवसेंदिवस निरा नदीच्या चांगल्या पाण्यात फलटण तालुक्यातील प्रकल्पांचे रसायनमिश्रित सांडपाणी मिसळून शिरवली बंधाऱ्यातील पाणी प्रदूषित होत असते. दरवर्षी या बंधाऱ्यात प्रदूषण होण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. नदीकाठचे नागरिक व शेतकरी या नरकयातना भोगत असताना राजकारण्यांना कोणतेही सोयरसुतक असल्याचे जाणवत नाही. नदीतील प्रदूषण रोखून नदीकाठची शेती वाचविण्यासाठी गटतट, राजकारण बाजूला ठेवून सामूहिक लढ्याची गरज आहे. मात्र, जगाचे होईल ते आपले होईल, याच मानसिकतेतून सर्वजण कपडे झटकून सामूहिक लढा देतील की नाही, हे न उलगडणारे कोडे आहे.

शिरवली बंधाऱ्यात काही दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा

बारामती व फलटण तालुक्याच्या सीमेवरून निरा नदी वाहते. या नदीवर ठिकठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. या नदीवरील शिरवली बंधाऱ्यातील पाणी प्रदूषित झाले आहे. या बंधाऱ्याच्या दरपांतून मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे. या बंधाऱ्यातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या गळतीमुळे लवकरच बंधारा कोरडा पडण्याची शक्यता बळावली आहे. अशा या गंभीर परिस्थितीत गावागावांतील गटातटाच्या कुरघोड्यांमुळेच प्रदूषणात वाढ होऊन शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.

शिरवली बंधाऱ्यातून दूषित पाणी निरावागज बंधाऱ्यात जात असल्याने या बंधाऱ्यावरील लाभधारक शेतकऱ्यांनी प्रदूषणाबाबत आवाज उठविला आहे. मात्र, शिरवली बंधाऱ्यातील दूषित पाण्याबाबत येथील लाभधारक शेतकरी अजूनही जमिनीवर येताना दिसत नाहीत.
वास्तविक, या गंभीर प्रश्नांबाबत कायदेशीर मार्गाने हालचाली सुरू करण्याची गरज आहे. मात्र, अपवाद वगळता अनेक जणांची मानसिकता 'दे रे हरी पलंगावरी' अशीच अवस्था झाली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news