

पुणे : दुबार, तिबार नाव हा शब्द ऐकला की, प्रत्येकाला मतदार यादी आठवते. मात्र, हेच प्रकरण निवडणुकांसाठी उमेदवारांनी सादर केलेल्या अर्जांनाही तंतोतंत लागू होते. घोले रोड क्षेत्रीय कार्यालयात महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करताना उमेदवारांनी चक्क दोन, तीन तर काहींनी चार अर्ज सादर केले आहेत.
छाननीदरम्यान यातील अर्ज माघारीही घेण्यात येतील. मात्र, अल्पशिक्षितांपासून उच्चशिक्षित उमेदवारांच्या या अर्जांमुळे प्रशासकीय यंत्रणांना चांगलेच कामाला लावल्याचे चित्र आहे.
पुणे महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजताच अनेक इच्छुकांनी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू केली. एखाद्या छोट्याशा चुकीमुळे अर्ज बाद होऊ नये यासाठी बहुतांश उमेदवारांनी दोन ते तीन अर्ज भरण्यास प्राधान्य दिले.
अर्ज भरण्यापूर्वी छाननी अधिकाऱ्यांकडून छाननी केल्यानंतरही त्यावर भरोसा नसल्याने दुबार, तिबार अर्ज भरण्यात आले आहेत. बहुतांश उमेदवारांनी एकाच दिवशी हे अर्ज भरले असून काहींनी दरदिवशी एक अर्ज भरल्याने तोही विषय चांगलाच चर्चेचा ठरला.