

पुणे : क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. यामुळे भारतात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळाला.
याच भिडेवाड्याच्या ठिकाणी सध्या स्मारकाचे काम सुरू असून, मुलींच्या पहिल्या शाळेच्या स्थापना दिनानिमित्त गुरुवारी (दि. 1 जानेवारी) मुलींची पहिली शाळा सार्वजनिक स्मारक निर्माण समितीच्या वतीने भिडेवाड्यासमोर स्त्री शिक्षण गौरव दिन साजरा केला जाणार आहे.
चलो, भिडेवाडा एकसाथ! हा कार्यक्रम आयोजित केला असून, महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना गुरुवारी (दि.१) अभिवादन करून त्यांच्या विचारांवर चालण्याचा निर्धार करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम सकाळी साडेनऊ वाजता बुधवार पेठेतील भिडेवाड्यासमोर होईल, अशी माहिती समितीचे नितीन पवार यांनी दिली.