पुणे; पुढारी वृत्तसेवा : एकाच तिकीट यंत्रणेमध्ये पुणेकर प्रवाशांना पीएमपी आणि मेट्रोमध्येही सोयीस्कररित्या प्रवास करता यावा, यासाठी पीएमपी प्रशासनाने मेट्रो सोबत तिकीट यंत्रणा कनेक्ट करावी, असे मत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया या उपक्रमांतर्गत पीएमपीएमएलमध्ये रविवारपासून क्यू आर कोड म्हणजेच गुगल पे तिकीट यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. या सेवेचा शुभारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कोथरूड आगारात करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी पालकमंत्री पाटील यांनी स्वतः गुगल पे यंत्रणेच्या माध्यमातून तिकीट काढून बस प्रवास केला. त्यांच्यासोबत पीएमपीएमएलचे अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह व पीएमपीएमएलचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. या सेवेमुळे पीएमपीचे वाहक आणि प्रवाशांमध्ये सुट्ट्या पैशांवरून होणारे वाद कायमचे संपुष्टात येणार आहेत. त्यासोबतच तिकीट वाटपातील भ्रष्टाचार देखील थांबणार आहे. त्यामुळे पीएमपी प्रशासनाला आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हेही वाचा