Manoj Jarange Patil: कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही- मनोज जरांगे पाटील | पुढारी

Manoj Jarange Patil: कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही- मनोज जरांगे पाटील

जिंतूर, पुढारी वृत्तसेवा : पूर्वीपासून मराठा आणि कुणबी एकच आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठा समाजातील बांधवांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही, असे इशारा मनोज जरांगे -पाटील यांनी जिंतूर येथे आयोजित सभेत दिला. मराठा आरक्षण संदर्भात १४ ऑक्टोबररोजी आंतरवाली सराटी येथे होत असलेल्या जाहीर सभेच्या अनुषंगाने शनिवारी शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात मनोज जरांगे- पाटील यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते  (Manoj Jarange Patil) बोलत होते.

दरम्यान यावेळी सकल मराठा समाज बांधवांच्यावतीने जरांगे यांच्या गाडीसह ताफ्यावर पुष्पवृष्टी करून फटाक्यांची आतषबाजी करून त्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून करण्यात आले. तालुक्यातील प्रत्येक गावातील सकल मराठा समाजाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

जरांगे- पाटील म्हणाले की, मी समाजाशी प्रमाणिक आहे. सरकारने आत्तापर्यंत अनेक आश्वासने देऊन नवनवीन शासन आदेश काढून दिशाभूल करण्याचे काम केले आहे. अंतरवाली सराटी येथील उपोषणाला अनेक नेत्यांनी भेटी दिल्या. मात्र, मागणीपासून आपण बाजूला गेलो नाही. आंदोलन मोडीत काढण्यासाठी वेगवेगळ्या तंत्राचा वापर केला गेला. एवढे करूनही महिला – पुरुषांवर अमानुष लाठी हल्ला करण्यात आला. एवढे होऊनही मागे हटलो नाही.

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने एक महिन्याची मुदत मागितली होती. आपण त्यांना दहा दिवस वाढीव मुदत दिली आहे. त्यानुसार येत्या ऑक्टोबरला शासनाने आश्वासन देऊन एक महिना पूर्ण होत असल्याने या दिवशी सरकारला एक इशारा म्हणून १४ ऑक्टोबररोजी अंतरवाली सराटी येथे आयोजित करण्यात आलेल्या मराठा आरक्षण मेळाव्याला मोठ्या संख्येने समाज बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी मराठा समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

होणारा विजय हा मराठ्यांचा

आरक्षणाचा होणारा विजय हा मराठ्यांचा आहे. त्यामुळे सर्वांनी एकजूट ठेवावी. समाजातील कोणीही टोकाचे पाऊल उचलू नये. आंदोलनामध्ये कायदा व सुव्यवस्था आबाधित ठेऊन शांततेत आंदोलनात सहभाग नोंदवा, असे आवाहन मनोज जरांगे-पाटील यांनी केले.

हेही वाचा 

Back to top button