

पुणे : भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेच्या मांजरी (पुणे) येथील पुष्पविज्ञान संशोधन संचालनालय आणि आणि बंगळुरू येथील 'द फ्लोरा डिझाइन प्रायव्हेट लिमिटेड, बंगळुरू'' या कंपनीसोबत काढणीपश्चात गुलाबाची टिकवणक्षमता वाढवण्यासाठी 'डीएफआर फूल शक्ती (रोज)' चा व्यावसायिकीकरण सामंजस्य करार नुकताच संपन्न झाला आहे.
पुणे येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेचे पुष्प विज्ञान संशोधन संचालनालय (आयसीएआर-डायरेक्टर फ्लोरिकल्चर रिसर्च तथा डीएफआर), १६ वा वर्धापन दिन नुकताच मांजरी येथे साजरा करण्यात आला. त्यामध्ये आयोजित कार्यक्रमात हा सामंजस्य करार पार पडला. पुष्पविज्ञान संस्थेचे संचालक डॉ. के. व्ही. प्रसाद व कंपनीचे प्रतिनिधींनी यावेळी स्वाक्षऱ्या करून कराराचे अदान-प्रदान केले.
गुलाब हे व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाचे तसेच कट फ्लॉवर्समधील मुख्य फुलपीक आहे; परंतु गुलाब हे अतिशय नाशवंत फुल आहे आणि काही तासांताच फुले खराब होतात. कापलेल्या गुलाबाची टिकवणक्षमता वाढवण्यासाठी जागतिक स्तरावर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. असे असले तरी ते बहुतेकदा महाग असतात आणि भारतात आयात केले जातात. ही तफावत लक्षात घेऊन, आयसीएआर-डीएफआर-पुणे यांनी संशोधन करून परवडणाऱ्या घटकांचा वापर करून ''डीएफआर फूल शक्ती (रोज)'' या नावाने फॉर्म्युला विकसित केला आहे.
ऑनलाइन विक्रीद्वारे पुष्पगुच्छ वितरणास मोठ्या प्रमाणात मागणी आहे. संबंधित कंपनीद्वारे देशभरात पुष्पगुच्छ, फुलांचे डिझाइन, हाताचे गुच्छ वितरीत करते. आयसीएआर-डीएफआर येथील डॉ. गणेश बी. कदम, डॉ. बासित रजा, डॉ. तारकनाथ सहा , डॉ. प्रभा के., डॉ. शिवकुमार के. या शास्त्रज्ञांच्या टीमने त्याचे तीन वर्षे संशोधन केले आणि विविध ठिकाणी यशस्वीरीत्या प्रयोग करून फॉर्म्युला तयार करण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे.