

पुणे : सिक्कीममधील औषध कंपनीच्या नावे बनावट औषधविक्रीचा प्रकार अन्न आणि औषध प्रशासन विभागाने (एफडीए) उघडकीस आणला. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
याबाबत एफडीए निरीक्षक श्रीकांत पाटील यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सदाशिव पेठ, कर्वे रस्ता, उत्तर प्रदेशातील लखनौ तसेच बिहारमधील गोपालगंज भागातील औषधविक्रेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शहरात 'कायमोराल फोर्ट' ( सूज कमी करणारी गोळी) या औषधाची बनावट विक्री होत असल्याची माहिती 'एफडीए'च्या अधिकाऱ्यांना मिळाली.
त्यानुसार एफडीएच्या पथकाने सदाशिव पेठेतील अक्षय फार्मा येथून औषधांचे नमुने गोळा करून तपासणीसाठी पाठवले. अक्षय फार्मा यांनी सदाशिव पेठेतील आर्जस मेडिकल अँड डिस्ट्रिब्युटर्सकडून या औषधांची खरेदी केली होती. आर्जस मेडिकलला हा पुरवठा एरंडवणेतील रिद्धी फार्माकडून झाला होता, असे तपासातून समोर आले.
रिद्धी फार्माची चौकशी केली असता, त्यांनी या औषधांची खरेदी लखनौ (उत्तर प्रदेश) येथील मे. सेना फार्मा येथून केल्याचे समोर आले. यानंतर एफडीएच्या पथकाने लखनौत जाऊन तपासणी केली असता मे. सेना. फार्मा यांनी ही औषधे गोपालगंज (बिहार) येथील महिवाल मेडिको येथून खरेदी केल्याचे स्पष्ट झाले. गोपालगंज येथून उमंग रस्तोगी नावाच्या व्यक्तीने दोन कोटी २३ लाख ७२७ रुपयांच्या औषधांची खरेदी केली होती. रस्तोगीने हे पैसे महेश गर्गला रोखीने हस्तांतरित केले होते. मात्र, गोपलगंज येथील कंपनीचा परवाना २० नोव्हेंबर २०२४ रोजी कालबाह्य झाला असल्याचे तपासात समोर आले. त्यामुळे सिक्कीम येथील कंपनीचे खोटे लेबल लावून औषधांची विक्री करण्यात येत होती.
या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. नियमानुसार बनावट औषधांची विक्री किंवा खरेदी केल्यास ७ ते १० वर्षांचा तुरुंगवास आणि १० लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. बनावट औषधांची विक्री टाळण्यासाठी पुणे विभागात नियमितपणे कारवाई करण्यात येत असल्याचे एफडीए पुणे विभागाचे सहआयुक्त गिरीश हुकरे यांनी सांगितले.