

पुणे : पत्रकार हा समाजाच्या शेवटच्या घटकासाठी काम करणारा असून, त्यांना सेवा व सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा विचार आहे. पुणे प्रेस क्लबच्या उभारणीसाठी सर्वतोपरी मदत करू. नागपूरप्रमाणेच पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार संकुलासाठी मदत केली जाईल, अशी ग्वाही राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिली.
गुरुवारी सायंकाळी पुणे श्रमिक पत्रकार संघ तसेच पत्रकार प्रतिष्ठानच्या वतीने बावनकुळे यांचा प्रेस क्लबसाठी जागा दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संघाच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बानकुळे यांच्या समवेत व्यासपीठावर चेतनानंद महाराज, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले, प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेश काळे, कार्यवाह पांडुरंग सांडभोर, कोषाध्यक्ष सुमित भावे, पत्रकार उमेश काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बावनकुळे यांचा पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला, तर बावनकुळे यांनी प्रेस क्लबच्या जागेची अधिकृत सरकारी अध्यादेशाची मूळ प्रत सुपूर्द केली.
यावेळी शैलेश काळे, पांडुरंग सांडभोर, सुमित भावे आणि उमेश काळे यांनी बावनकुळे यांनी प्रेस क्लबसाठी दिलेल्या जागेबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत महसूलमंत्री बावनकुळे यांचे आभार मानले. सत्काराला उत्तर देताना बानवकुळे म्हणाले, पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. समाजाच्या शेवटच्या घटकासाठी तो सदैव झटतो. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वंच पत्रकार संघटना मोठ्या झाल्या पाहिजेत. त्यासाठी नागपूरप्रमाणे पुणे, मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर येथे प्रेस क्लबसाठी जागा दिली जाणार आहे. तसेच ते बांधून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व अंजली खमीतकर यांनी आभार मानले.
ओळः महसूलमंत्री बावनकुळे यांचा सत्कार करताना पुणे श्रमिक पत्रकार संघ व प्रतिष्ठानचे पदाधिकारी.