सहकारी रक्तपेढ्या अद्यापही निघेनात लालफितीबाहेर

सहकारी रक्तपेढ्या अद्यापही निघेनात लालफितीबाहेर

ज्ञानेश्वर भोंडे

पुणे : रक्तदात्यांकडून कर्तव्यभावनेतून मोफत रक्तदान करून घ्यायचे आणि दुसरीकडे रुग्णांना रक्त देताना केवळ व्यावसायिक हित जोपासायचे. इतकेच नव्हे, तर रक्ताचा धंदा करीत नफा ओरपायचा, असे धोरण सध्याच्या रक्तपेढ्यांकडून सुरू आहे. त्यासाठी या खासगी रक्तपेढ्यांवर नियमांची टाच आणण्याबरोबरच शहरात सहकार तत्त्वावर रक्तपेढी उभारली जावी, अशी संकल्पना सामाजिक संस्था व आरोग्य क्षेत्रात कार्यरत कार्यकर्त्यांनी मांडली अन् शासनदरबारी पाठपुरावा सुरू केला. मात्र, शासकीय उदासीनता आणि लालफितीच्या कारभारामुळे यात अडथळे येत आहेत.

रक्त फुकट घ्यायचे अन् पैसा कमवायचा!

आपल्याकडील रक्तदात्यांना रक्तदान, समाजसेवेचे भान आहे. कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता निरपेक्ष भावनेतून हे रक्तदाते रक्तदान करतात. मात्र रक्तपेढ्या एका रक्तदानातून तीन ते चार घटक वेगवेगळे करून ते अवाच्या सवा दरात विकतात. एका पिशवीची किंमत 1400 रुपये असताना शहरातील रक्तपेढ्या त्यासाठी प्रसंगानुरूप दोन ते अडीच हजार आकारतात. म्हणजे एकाच्या रक्तदानातून रक्तपेढींना पाच ते सहा हजार रुपयांचा फायदा होतो. मोफत मिळालेल्या रक्ताच्या जिवावर रक्तपेढ्या अलगद नफ्याची मलई काढतात. तर गरीब असो, शासकीय योजनेतील रुग्ण असो वा सर्वसामान्य रुग्ण असो त्यांना सवलत न देता केवळ फायदा बघतात, असे रक्तदान करणार्‍या क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे निरीक्षण आहे.

रुग्णहित जपणार्‍यांची रक्तपेढ्यांची संख्या कमी

पुणे शहरात खासगी आणि धर्मादाय तत्त्वावरील मिळून 35 रक्तपेढ्या आहेत. सर्व केवळ व्यावसायिक हित जपतात. मात्र, रुग्णहित जपणार्‍या रक्तपेढ्या फार कमी आहेत. या धर्तीवर रक्तदात्यांच्या हितासाठी आणि रुग्णांना नफेखोरी न करता कमीत कमी दरात रक्त मिळावे यासाठी सहकारी तत्त्वावर रक्तपेढी असावी, अशी संकल्पना शहरातील रक्तहितवर्धिनी या संस्थेने प्रथमच मांडली आहे. केवळ संकल्पनाच मांडली नाही तर त्याबाबत शासनदरबारी पाठपुरावादेखील संस्थेचे चंद्रशेखर शिंदे व इतर कार्यकर्ते करत आहेत. मात्र, लाल फितीचा कारभार आणि शासकीय उदासीनता यामुळे त्यांना अडथळे येत आहेत.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या आश्वासनानुसार महाराष्ट्रातील मेडिकल कॉलेजअंतर्गत शासकीय रक्तपेढ्यांमध्ये 850 रुपयांत मिळणारी रक्तपिशवी रुग्णांसाठी राष्ट्रीय आरोग्य मंत्रालय, राष्ट्रीय आरोग्य अभियानाद्वारे (एनएचएम) मोफत देण्याची योजना जाहीर केली. त्याचा फायदा गरजू रुग्णांना होत आहे. याबद्दल त्यांचा आभारी आहे. मात्र, याचबरोबर आरोग्यमंत्री टोपे यांनी खासगी स्तरावरील रक्तपिशव्यांची दरवाढ नियंत्रित करण्याचे आश्वासन दिले होते. त्यावर अजून अंमलबजावणी झाली नाही, अशी नाराजी शिंदे यांनी व्यक्त केली.

''सहकाराच्या निरपेक्ष भावनेतून गरजू रुग्णांसाठी रास्त दरातच रक्तपिशवी उपलब्ध व्हावी यासाठी रक्तहितवर्धिनी पवित्र राष्ट्रीय कार्य करत आहे. रक्तदात्यांची सहकार तत्त्वावर आधारित शहर पातळीवर हक्काची रक्तपेढी असावी या संदर्भात 2014 पासून आरोग्य, तसेच अन्न औषध मंत्रालयास रक्तहितवर्धिनी सामाजिक संस्था निवेदने, पत्रव्यवहार, आंदोलन करत शासन दरबारी पाठपुरावा करत आहे. सहकार तत्त्वावर आधारित रक्तदात्यांची हक्काची रक्तपेढी सुरू करण्यासाठी शासकीय मदत, जागेसंदर्भात पाठपुरावा सुरू आहे.''           – चंद्रशेखर शिंदे, रक्तहितवर्धिनी संस्था, श्री क्षेत्र लाल महाल

या आहेत रक्तपेढ्यांबाबत मागण्या
  • खासगी स्तरावरील 1500 ते 2000 पर्यंत मिळणार्‍या रक्तपिशवीची अवास्तव दरवाढ त्वरित नियंत्रणात आणावी.
  • रक्तदान क्षेत्रात पारदर्शकता येण्यासंदर्भात शहर-राज्य पातळीवर प्रबोधन समिती गठित करण्यात यावी.
  • रक्तदान क्षेत्रात खर्‍या अर्थाने सहकार तत्त्वावर आधारित रक्तदात्यांच्या रक्तपेढीसंदर्भात शासकीय मदतीची आणि सहकाराची घोषणा करावी. त्यामुळे नक्कीच निरपेक्ष भावनेतून रक्तदान करणार्‍या रक्तदात्यांच्या रक्तदानास न्याय मिळेल आणि रक्ताचा तुटवडाही निर्माण होणार नाही.
  • रक्तदानाच्या क्षेत्रात चांगल्या प्रकारेच प्रबोधन झाले पाहिजे. सद्य:स्थितीत अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी रक्तदान करण्यासाठी काही चुकीच्या प्रथा जसे रक्तदात्यास मोठमोठ्या भेटवस्तू अशी आमिषे दाखवून जाहिराती केल्या जातात, ज्यामुळे बर्‍याचदा रक्तदानासाठी होणार्‍या गर्दीमुळे घाईगडबडीत रक्तदानाच्या नियमांनाच हरताळ फासला जातो.
  • एफडीएमार्फत रक्तपेढ्यांना स्टॉक डिस्प्लेप्रमाणे रेटचार्ट आणि अघोरी भेटवस्तूंवर निर्बंध लादल्याचे समजपत्र द्यावे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news