

निनाद देशमुख
पुणे: शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून 3 नोव्हेंबरपासून शहरात खड्डेमुक्त रस्ते अभियान राबवले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेक रस्त्यावर व मुख्य चौकात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. शहरात मध्यवधीत तर सीसीटीव्हीच्या कामासाठी पोलिस आणि महाप्रीतफकडून खोदाई सुरू असल्याने रस्त्यांची वाट लागली आहे. तर काही भागात चांगले रस्ते व पदपथ फोडले जात आहेत. त्यामुळे शहरात एकीकडे खड्डेमुक्ती तर दुसरीकडे रस्ते खोदाईमुळे रस्त्यांची दुरवस्था कायम आहे.
महापालिकेकडून शहरात विविध सेवा वाहिन्या टाकण्यासाठी शासकीय, निमशासकीय व खासगी संस्थांना सशुल्क परवानगी दिली जाते. पथ विभागाकडून 1 ऑक्टोबर ते 31 एप्रिलपर्यंत खोदाईला परवानगी दिली जाते. त्यानंतर 1 मे रोजी खोदाई बंद करून 31 मे पर्यंत रस्ते दुरुस्त करणे बंधनकारक असते. तसेच पथ विभागाकडून पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्ते दुरुस्ती केले जातात. मात्र, खोदाईनंतर दुरुस्तीची कामे योग्य प्रकारे केली जात नाहीत, त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडतात. पावसाचे पाणी आणि खड्डे यामुळे वाहतूक मंदावते. शहरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने अनेक अपघात होत होते. याबाबत महापालिकडेकडे तक्रारी आल्यावर आयुक्त नवल किशोर राम यांनी शहराची पाहणी केली. या पाहणीत रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे व अशास्त्रीय दुरुस्तीमुळे मोठी समस्या निर्माण झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी शहरात खड्डे मुक्त अभियान राबवण्यास सुरुवात केली. हे अभियान 3 नोव्हेंबरपासून सुरू आहे. 15 पथकांच्या माध्यमातून ना नफा ना तोटा या तत्वावर या पथकांना प्रत्येकी 10 - 10 किलोमीटरची जबाबदारी दिली आहे. यासाठी सात ठेकेदारांना काम नेमून दिले आहे.
पाषाण रस्ता खोदला
पाषाण रस्त्यावर पूर्वी एकही खड्डा नव्हता. हा रस्ता चांगला असताना येथे आता पाइप लाइन टाकण्यासाठी हा रस्ता खोदला आहे. या पूर्वी हा रस्ता पोलिसांच्या सीसीटीव्ही वायर टाकण्यासाठी खोदण्यात आला. ही केबल टाकताना चांगला रस्ता थेट मधून खोदला आहे. त्यामुळे या रस्त्यावर खड्डे पडले असून अद्याप हे खड्डे दुरुस्त केलेले नाहीत.
लक्ष्मीनारायण ते स्वारगेट रस्त्यावर खड्डे
पुण्यातील अतिशय गजबजलेला व वाहनांची सर्वाधिक ये-जा असणाऱ्या लक्ष्मीनारायण रस्ता ते स्वारगेट चौकादरम्यान रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये वाहने आदळून त्यांचे नुकसान होत आहे. या मार्गावरील खड्डे अद्याप बुजवण्यात आलेले नाहीत.
पदपथ फोडल्याने रस्त्यावरून चालण्याची वेळ
पुण्यातील सेव्हन लव्हज चौक, रविवार पेठे, पाषाण रस्ता, शिवाजी महाराज रस्ता या सह विविध भागांत रस्ते खोदाई सुरू आहे. मध्यवस्तीत गर्दी ठिकाणी रस्ते खोदून ठेवून तीन-चार दिवस झाले तरीही तेथे दुरुस्तीची कामे करण्यात आलेली नाही. टिळक चौकात देखील पदपथ खोदण्यात आले आहे. तर म्हात्रे पूलांकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पदपथ देखील फोडून केबल टाकण्यात आल्या आहेत. यामुळे नागरिकांना थेट रस्त्यावरून चालावे लागत आहे.
पथ विभागाचे दुर्लक्ष
शहरात सुरू असलेल्या खोदाइला अनेक नागरिक कंटाळले आहेत. त्यांनी या बाबत आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे थेट तक्रारी केल्या आहेत. ही रस्ते खोदाई योग्य पद्धतीने होऊन रस्ते पुन्हा बुजवले जातात की नाही यावर महापालिकेने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. महापालिकेच्या अभियंत्यांनी खोदाईसाठी आखून दिलेली नियमावलीचे पालन होते की नाही हे पाहणे गरजेचे असतांना तसे होतांना दिसत नाही.
पोलिसांच्या सीसीटीव्ही केबलसाठी ठेकेदाराची मनमानी रस्ते खोदाई
शहरात एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटरची स्थापना (आयसीसीसी) करण्यात येत आहे. सर्व महापालिका कार्यालये, दवाखाने, शाळा, सिग्नल सिस्टीम आणि सीसीटीव्ही कॅमेरे ऑप्टिकल फायबरद्वारे जोडले जाणार आहे. महापालिकेचे डिजिटल होर्डिंगदेखील ऑप्टिकल फायबरद्वारे जोडले जाणार आहे. यासाठी महाप्रीत, दिनेश इंजिनिअर्स आणि महानगरपालिका यांच्यात शहरातील 500 किलोमीटर रस्त्यांवर ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी करार झाला आहे. यासाठी शहरभर रस्त्यांची खोदाई केली जात आहे. या सोबतच पोलिसांच्या सीसीटीव्हीसाठी देखील रस्त्यांची खोदाई केली जात आहे. ही दोन्ही कामे करतांना ठेकेदार महापालिकेने दिलेल्या नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहे. रस्ता खोडल्यावर तो योग्यपद्धतीने बुजवून पुन्हा त्याचे डांबरीकारण केले जात नाही. त्यामुळे रस्त्यावर खडी पसरून वाहने घसरुन अपघात होत आहेत.
म्हात्रे पुलाकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारील पदपथ केबल टाकण्यासाठी फोडण्यात आले आहेत. त्यामुळे रस्त्याने पायी जाताना आता पदपथ उरलेला नाही. त्यामुळे जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून चालावे लागते.
रमेश शिंदे, विद्यार्थी