PMC Election: प्रभाग 37 मध्ये चौरंगी लढत निश्चित! फुटलेल्या पक्षांनी बदलले संपूर्ण राजकीय गणित
आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 37 मधील राजकीय वातावरण आता तापू लागले आहे. चार सदस्यांच्या या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत झालेल्या फुटीमुळे राजकीय समीकरणे बदलल्याने निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता या प्रभागात चौरंगी लढत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसने तीन आणि भाजपने एका जागेवर विजय मिळवला होता. त्या वेळी या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य होते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये सरळ लढत झाली होती. विशाल तांबे विरुद्ध गणेश भिंताडे, वर्षा तापकीर विरुद्ध श्रद्धा परांडे, बाळाभाऊ धनकवडे विरुद्ध अभिषेक तापकीर आणि अश्विनी भागवत यांच्या विरोधात मोहिनी देवकर यांच्यात थेट लढत झाली होती. यात अनुक्रमे तांबे, तापकीर, धनकवडे आणि भागवत विजय झाले होते. आगामी निवडणुकीसाठी या प्रभागात ‘अ’ गट नागरिकांचा मागास प्रवर्ग, ‘ब’ आणि ‘क’ गट सर्वसाधारण (महिला) प्रवर्ग आणि ‘ड’ गटात सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण आहे.
गेल्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून शरद पवार पक्ष आणि अजित पवार गटात पक्षाचे विभाजन झाले आहे. तसेच शिवसेनेत फूट पडून ठाकरे गट आणि शिंदे गटात पक्ष विभागला गेला आहे. यामुळे आगामी निवडणुकीत आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार पक्ष) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), तसेच शिवसेना (ठाकरे गट) आणि शिवसेना (शिंदे गट) समोरासमोर येणार असल्याने निवडणूक चुरशीची होणार आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत या वेळी राजकीय समीकरणे बदली असून, या प्रभागाची निवडणूक चौरंगी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर हे या आधी या प्रभागातून निवडून आले होते. यामुळे या प्रभागात भाजपचा प्रभाव वाढलेला दिसत आहे. सध्या शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप एकत्र निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे. हा प्रभाग पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र पक्षाच्या फुटीमुळे दोन्ही गटांना फटका बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग््रासचे दोन्ही गट स्थानिक पातळीवर एकत्र लढले, तर मागील निकालाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. तसेच शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप एकत्र लढल्यास चौरंगी लढत अटळ असल्याचे राजकीय तज्ज्ञांनी सांगितने. शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी देखील या वेळी प्रभागात आपले खाते उघडण्याची कसोटी असणार आहे.
या प्रभागात इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे पक्षाचे तिकीट न मिळाल्यास काही जण बंडखोरी करून इतर पक्षांमधून निवडणूक लढवण्याचीही शक्यता आहे. माजी नगरसेवकांसह इतर इच्छुकांनी सामाजिक उपक्रमांतून मतदारांपर्यंत पोहचण्यास सुरूवात केली आहे.
विविध पक्षांतील इच्छुक उमेदवार
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) : अश्विनी भागवत, श्रद्धा परांडे, संकेत यादव, शंकर कडू, अंकुश कोकाटे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार पक्ष) : विशाल तांबे, बाळाभाऊ धनकवडे, किरण परदेशी. प भाजप : वर्षा तापकीर, मोहिनी देवकर, अभिषेक तापकीर, अरूण राजवाडे, दीपक माने, सचिन बदक.
शिवसेना (शिंदे गट) : गिरीराज सावंत, अनिल बटाणे, नितीन पायगुडे.
काँग्रेस : दिलीप दोरगे.
शिवसेना (ठाकरे गट) : तेजश्री भोसले

