

धनकवडीचा 1997 मध्ये महापालिकेत समावेश झाल्यानंतर परिसरात अनेक विकासकामे झाली आहेत. मात्र काही वर्षांपूर्वी महापालिकेत समाविष्ठ करण्यात आलेल्या आंबेगाव, आंबेगाव पठार, तळजाई पठार या भागातील नागरिक आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. अरुंद रस्ते, अतिक्रमणे आणि उपाययोजनांअभावी धनकवडीतील मुख्य रस्ता, सातारा रस्ता, त्रिमूर्ती चौक आणि तीन हत्ती चौकात सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या भागात नाट्यगृह, उद्याने, क्रीडागणांचा अभाव आहे.
प्रभागात लोकनेते ना. शरदचंद्र पवार बहुउद्देशीय भवनाची उभारणी केली. स्व. विलासराव तांबे दवाखान्याच्या माध्यातून नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध केली जात आहे. कचरा निर्मूलन व संकलन केंद्राची उभारणी करून प्रभागत कचरा आणि कंटेनर मुक्त केला आहे. तसेच 10 ते 12 ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राची उभारणी केली आहे. सावित्रीबाई फुले यांच्या नावाने नागरवस्ती विभाग प्रशिक्षण केंद्रांची उभारणी केली आहे.
विशाल तांबे, माजी नगरसेवक
धनकवडी परिसरात महापालिकेच्या माध्यमातून अनेक विकासकामे झाली असली. सातारा रस्त्यावर श्री सद्गुरू शंकर महाराज उड्डाणपूल झाल्याने वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत झाली आहे. लोकोपयोगी सर्वसमावेशक लोकनेते ना. शरदचंद्र पवार बहुउद्देशीय भवन उभारण्यात आल्याने नागरिकांची सोय झाली आहे. स्मशानभूमीमध्ये प्रदूषण नियंत्रण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. कै. उत्तमराव किसनराव धनकवडे शाळेचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. प्रभागात विविध ठिकाणी विरंगुळा केंद्र उभारण्यात आले आहे. आंबेगाव पठार परिसरातील काही रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. तसेच काही ठिकाणी जलवाहिन्या आणि ड्रेनेज लाइनची कामे झाली आहेत. मात्र या प्रभागात अद्यापही अनेक कामे बाकी असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. परिसरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाल्यामुळे रस्ते अरुंद झाल्याने वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे.
प्रभागतील स्मशानभूमीमध्ये प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसवली आहे. राऊत बाग, शिवशंकर चौक आणि विद्यानगरी या भागात कल्व्हर्टचे काम केले आहे. कै. उत्तमराव किसनराव धनकवडे शाळेचे सुशोभीकरण केले आहे. सर्व्हे नंबर 18 मध्ये डीपी रस्ता विकसित केला आहे. आंबेगाव पठार, सर्व्हे नंबर 17 ते 26 या भागातील पाण्याची समस्या सोडविली आहे. पाचगाव, पर्वती, वनविहार परिसरातील भिंतींना संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्या आहेत.
बाळाभाऊ धनकवडे, माजी नगरसेवक
आंबेगाव पठार परिसर चढ-उताराचा असल्याने या भागात कमी दाबाने आणि अनियमित पाणीपुरवठा होत आहे. पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यास राऊत बागेच्या परिसरातील घरांमध्ये पाणी शिरत आहे. खड्डे पडल्याने परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. कालबाह्य झालेल्या ड्रेनेज लाइन वारंवार तुंबत असल्याने दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यांवरून वाहत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मुख्य रस्त्यांवरील चौकांमध्ये वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
धनकवडी, आंबेगाव पठार परिसरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले. आवश्यक त्या ठिकाणी मोठ्या व्यासाच्या जलवाहिन्या आणि ड्रेनेज लाइन टाकण्यात आल्या आहेत. विद्युत वाहिन्या भूमिगत केल्या आहेत. मोहननगरमधील राजे चौक परिसरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण विकसित करण्यात आले. राजमाता जिजाऊ बहुउद्देशीय भवनाची उभारणी केली आहे. शिवशंकर चौक परिसरातील नाल्यावर बॉक्स कल्व्हर्ट बांधले.
वर्षा तापकीर, माजी नगरसेविका
प्रभागात या भागांचा समावेश
या प्रभागात धनकवडी गावठाण, राजमुद्रा सोसायटी, मुंगळे अण्णानगर, सह्याद्रीनगर, रामचंद्रनगर, राऊत बाग परिसर, प्रतिभानगर सोसायटी, मंदार सोसायटी, आंबेगाव पठार, तसेच नव्याने समाविष्ट झालेला कात्रज डेअरी, परिसरातील वंडर सिटी सोसायटी, सावंत विहार, श्रीराम दर्शन, सनशाइन सोसायटी, ख्याती हाइट्स, सावंत गार्डन भागाचा समावेश आहे.
धनकवडी परिसराचा महापालिकेत समावेश होऊन अनेक वर्षे झाली आहेत. निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींकडून जुनीच कामे केली जात आहेत. मात्र, नवीन प्रकल्प राबविण्याकडे माजी लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहेत. या भागात आजही क्रीडांगण, उद्याने, अभ्यासिका, सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव आहे. लोकप्रतिनिधी निवडून येणाऱ्यापूर्वी विविध आश्वासने देतात. नंतर मात्र त्याचा त्यांना विसर पडत आहे.
विजय क्षीरसागर, सामाजिक कार्यकर्ते
प्रभागातील प्रमुख समस्या
धनकवडीत जाणारा मुख्य रस्ता अतिक्रमणांमुळे अरुंद
धनकवडी, सातारा रस्ता आणि त्रिमूर्ती चौक, तीन हत्ती चौकात होणारी वाहतूक कोंडी
काही भागातील नागरिक अद्यापही मूलभूत सुविधांपासून वंचित
महापालिकेच्या शाळांकडे होणारे दुर्लक्ष
सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी नाट्यगृहाची गरज, तसेच उद्यानांचा अभाव
व्यावसायिकांनी केलेल्या अतिक्रणांमुळे अरुंद झालेले रस्ते
नागरिकांसाठी भाजी मंडईचा अभाव
प्रभागात झालेली प्रमुख कामे
लोकनेते ना. शरदचंद्र पवार बहुउद्देशीय भवन
ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्राची उभारणी
सर्व्हे नंबर 18 मधील डीपी रस्त्याचा विकास
महापालिकेचा स्व. विलासराव तांबे दवाखाना
रस्त्यांचे काँक्रिटीकरण, जलवाहिन्या आणि ड्रेनेज लाइनची कामे
मोहननगरमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण विकसित
राजमाता जिजाऊ बहुउद्देशीय भवनाची उभारणी
आंबेगाव पठार आणि मुंगळे आण्णानगर परिसरात जलवाहिन्या, ड्रेनेज लाइन आणि रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे केली आहेत. तसेच विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यात आल्या आहेत. शरदचंद्र पवार बहुउद्देशीय भवनाच्या चौथ्या मजल्याच्या कामासाठी पाठपुरावा केला. राजमुद्रा सोसायटी परिसरातील ड्रेनेजचे काम केले. नित्यानंद सोसायटी परिसरात जलवाहिन्या आणि रस्त्यांची कामे केली आहेत.
अश्विनी भागवत, माजी नगरसेविका