

पुणे: आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष शाखेकडे निवडणूक लढविण्यासाठी आपल्यावर किती गुन्हे दाखल आहेत, याची माहिती मिळविण्यासाठी तब्बल 2 हजार 650 जणांनी अर्ज सादर केले होते. त्यांपैकी तब्बल 1 हजार 500 अर्जदारांवर विविध स्वरूपांचे गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या 1 हजार 500 जणांपैकी सुमारे 60 उमेदवारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
गंभीर गुन्हे दाखल असलेले उमेदवार प्रत्यक्ष निवडणुकीत सहभागी असोत वा निवडणुकीतून माघार घेतलेली असो, अशा सर्वांवर पोलिसांकडून बारकाईने नजर ठेवण्यात येत आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्थेला बाधा येऊ नये, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी ही विशेष खबरदारी घेतली आहे. शहरात नामांकित तसेच नामचिन गुंड आणि त्यांच्या कुटुंबीयांनी निवडणुकीसाठी उमेदवारी मिळविल्याचेही समोर आले आहे. या उमेदवारांच्या हालचाली, प्रचारपद्धती, संपर्क आणि जमाव जमविण्याचे प्रयत्न यावर पोलिसांचे विशेष लक्ष आहे. सामाजिक शांतता अबाधित ठेवण्यासाठी, तसेच दहशत निर्माण होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहेत.
गजाच्या फोनाफोनीवर पोलिसांचे लक्ष
कुख्यात गुंड गजा मारणे हा पत्नीच्या विजयासाठी सक्रिय झाला असून, शहरात प्रवेशास मनाई असल्याने शहरालगतच्या गावातून कोथरूडमधील मतदारांना फोनाफोनी करून प्रचार करीत असल्याचे समोर आले आहे. याबाबतच्या तक्रारी पुणे पोलिसांकडे आल्या असून, गुंड मारणे आता पोलिसांच्या रडारवर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. पत्नीसाठी आता गजा मारणे स्वतः प्रचारात उतरल्याचे समोर आल्याने हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई झालेल्या गजा मारणे याला अलीकडेच न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. मात्र, जामीन देताना काही अटी व शर्थी घालण्यात आल्या आहेत. त्यानुसार निवडणूक काळात त्याला शहरात प्रवेश करता येत नसून, तो शहराच्या हद्दीबाहेरूनच फोनाफोनी करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मतदारांवर दबाव येतोय का, यावरही नजर
कोथरूड परिसरातील अनेक मतदारांना गजा मारणे याचे फोन येत असून, पत्नीला मदत करण्याचे आवाहन केले जात आहे. या फोनाफोनीमुळे मतदारांवर दबाव येत असल्याच्या तक्रारीही पोलिसांकडे प्राप्त झाल्या आहेत. निवडणूक आचारसंहिता आणि कायदा-सुव्यवस्थेचा भंग होऊ नये यासाठी पुणे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, कॉल्सची माहिती, संपर्क आणि हालचालींची तपासणी सुरू केली आहे. आवश्यक ती प्रतिबंधात्मक कारवाई केली जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
कठोर भूमिका घेण्याचीही तंबी
निवडणूक काळात दहशत, दबाव, बळाचा वापर किंवा आर्थिक प्रलोभनाच्या होणाऱ्या तक्रारी पाहता यासाठी विशेष शाखा, स्थानिक पोलिस ठाणे आणि गुप्तचर यंत्रणा, गुन्हे शाखा समन्वयाने काम करत आहेत. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर भूमिका घेतली जाईल, असा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे.
... हे लढवताहेत निवडणूक
पुण्यातील कुख्यात गुंड बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर, लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकर, बापू नायर, तसेच गुंड गजानन मारणे याची पत्नी निवडणूक लढवत आहेत. अन्य गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले गुन्हेगार आणि त्यांच्या नातेवाईकांनी निवडणूक रिंगणात उडी घेतल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा अधिक सतर्क झाली असून, संवेदनशील भागांमध्ये गस्त वाढविण्यात आली आहे.
गुन्हेगारांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष निवडणुकीवर प्रभाव पडणार नाही, याची पोलिस दक्षता घेत आहेत. गजानन मारणे काही जणांना निवडणुकीच्या अनुषंगाने संपर्क करीत असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. त्यानुसार पोलिस त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत.
अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर