

भोर: बसरापूर (ता. भोर) येथील ग्रामपंचायत हद्दीतील भाटघर धरणाच्या बॅकवॉटरकडे जाणारा रस्ता रात्रीच्या वेळी बंद करण्यात आला आहे. नदीकिनारी जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेड्स लावून सायंकाळी ७ ते सकाळी ७ या वेळेत वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. मागील महिन्यात झालेल्या ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत याबाबत ठराव मंजूर करण्यात आला होता.
मागील काही दिवसांपासून बसरापूर येथील भाटघर धरणाचे बॅकवॉटर पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. मात्र, या गर्दीचा फायदा घेत काही हुल्लडबाज तरुण रात्रीच्या वेळी मद्यपान, धूम्रपान, पार्ट्या आणि धांगडधिंगा करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. परिसरात रिकाम्या बाटल्या फोडणे, कचरा करणे, मोठ्या आवाजात गोंधळ घालणे, असे प्रकार घडत आहेत. काही तरुण रात्रीच्या वेळी नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर भरधाव दुचाकी चालवणे, मोठमोठ्याने हॉर्न वाजवणे तसेच बुलेटचे फटाके वाजवून नागरिकांना त्रास देत आहेत.
अशा गैरवर्तनामुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा आणि शांततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना व नागरिकांना रात्री नदीकडे जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. या परिसरात धूम्रपान व मद्यपान करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. ये-जा करताना अश्लील व अपशब्दांचा वापर करणे किंवा कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही.
रस्ता बंद असताना बॅरिकेड्स हटवून ग्रामपंचायत हद्दीत प्रवेश केल्यास संबंधित वाहन आणि व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती स्वतः जबाबदार राहील, असे ग्रामपंचायतीने स्पष्ट केले आहे. परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आली असून, बाहेरून येणाऱ्या पर्यटकांनी व नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या वेळी सरपंच नीलम झांजले, ग्रामसेविका मेघा गावडे, उपसरपंच रामदास झांजले, ग्रामपंचायत सदस्य राजश्री साळुंके, शोभा झांजले, स्वाती कुंभारकर, अजित बदक, पुंडलिक बदक, नीता बदक आणि कुणाल मांढरे उपस्थित होते. रात्रीच्या वेळी नदीकिनारी मद्यपान करताना अथवा कायद्याचा भंग करताना आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा भोर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नीलेश माने यांनी दिला आहे.