

पुणे: अतिक्रमण कारवाईत राजकीय दबावाला बळी पडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी महापालिका प्रशासन ठामपणे उभे राहणार आहे. ज्या ठिकाणी कारवाई करण्यासाठी अधिकारी जाण्यास धजावणार नाहीत, अशा ठिकाणी मी स्वतः उपस्थित राहून कारवाई करणार, असा इशारा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिला. शहरात गेल्या आठवड्यापासून अतिक्रमणविरोधी मोहीम सुरू असली, तरी आतापर्यंत केवळ चार ते पाच टक्केच अतिक्रमणे हटविण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी वरील माहिती दिली. आयुक्त राम म्हणाले, की अनेक ठिकाणी अतिक्रमण कारवाई करताना अधिकाऱ्यांना राजकीय दबावाचा सामना करावा लागतो. काही ठिकाणी माननीयांचा दबाव असतो, तर काही ठिकाणी त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत बदली किंवा अन्य कारवाईच्या भीतीने अधिकारी संबंधित ठिकाणी जाणे टाळतात. मात्र, अधिकाऱ्यांना पाठबळ देणे आणि त्यांच्या पाठीशी उभे राहणे ही माझी जबाबदारी आहे. त्यामुळे जिथे अधिकारी जाण्यास घाबरतील, तिथे मी स्वतः उभा राहून कारवाई करणार आहे.
पथारी व्यावसायिकांसाठी अधिकृत जागांचा शोध
शहरातील पथारी व्यावसायिक आणि अनधिकृत भाजी मंडईंच्या प्रश्नावर केवळ अतिक्रमण हटवून तो सुटणार नाही. या व्यावसायिकांसाठी अधिकृत जागा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. सध्या सुमारे २२ हजार पथारी व्यावसायिकांची नोंदणी आहे. मात्र, प्रत्यक्षात ही संख्या तीन लाखांच्या आसपास असून, नोंदणीकृत व्यावसायिकांच्या तुलनेत ती जवळपास दहापट अधिक आहे. परवाना नसलेल्या व्यावसायिकांना पोलिस, महापालिका कर्मचारी किंवा अन्य व्यक्तींकडून त्रास आणि पैशांची वसुली होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे इच्छुक व्यावसायिकांची नोंदणी करून त्यांना अधिकृत व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा विचार असल्याचे राम यांनी सांगितले. यासाठी शहरातील रिकाम्या जागा, बंद किंवा रिकाम्या भाजी मंडई आणि गोठ्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या जागांचा वापर करून सेंट्रल मार्केट उभारण्याचे नियोजन करावे लागेल. अतिक्रमणांवर कारवाई करण्याबरोबरच व्यावसायिकांना पर्यायी जागा उपलब्ध करून देणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
रस्त्यांवरील मंडईही आता महापालिकेच्या रडारवर!
शहरातील रस्ते आणि पदपथांवर भरणाऱ्या अनधिकृत भाजी मंडईंवरही महापालिका प्रशासनाची नजर असणार आहे. केवळ कारवाई करून हा प्रश्न सुटणार नसल्याने अशा मंडईंचे नियोजन करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी शहरातील रिकाम्या जागा, बंद किंवा वापरात नसलेल्या भाजी मंडई आणि गोठ्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या जागांवर पथारी व्यावसायिकांसाठी अधिकृत बाजारपेठा विकसित करण्याचा विचार आहे.