पिंपरी: भामा आसखेड ते चिखली जलवाहिनीचे काम 6 महिन्यांत करण्याचे नियोजन

पिंपरी: भामा आसखेड ते चिखली जलवाहिनीचे काम 6 महिन्यांत करण्याचे नियोजन

पिंपरी (पुणे) : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणातून 167 एमएलडी पाणी आणले जाणार आहे. त्यासाठी आतापर्यंत 11 किलोमीटर अंतराची भूमिगत जलवाहिनी टाकण्यात आली आहे. उर्वरित 21 किलोमीटर अंतराचे काम येत्या 6 महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी मंगळवारी (दि.4) सांगितले.

भामा आसखेड धरण ते नवलाख उंबरे आणि तेथून चिखली जलशुद्धीकरण केंद्र असे एकूण 31 किलोमीटर अंतराची भूमिगत जलवाहिनी टाकण्याचे काम आहे. जलवाहिनी टाकण्यासाठी वन, पाटबंधारे, एमआयडीसी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपालिका, ग्रामपंचायत तसेच, खासगी जागा ताब्यात घेण्यात अडचणी येत आहे. या जागा तातडीने उपलब्ध करून देण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकार्‍यांना आदेश दिले होते. त्यानुसार विविध विभागाच्या अधिकार्यांच्या अनेक बैठका घेण्यात आल्या आहेत. प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी जागा ताब्यात घेण्यास पालिका प्रशासनाकडून प्राधान्य देण्यात आले आहे.

पोलिस बंदोबस्तात खासगी जागेत जलवाहिनीचे काम करण्यात येत आहे. एका ठिकाणी एक हजार 800 मीटर आणि एका ठिकाणी 2 किलोमीटर अंतराची जागा ताब्यात आली आहे. तेथे लवकरच काम सुरू केले जाणार आहे. उर्वरित मार्गावरील जागेचा ताबा घेण्याची प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे. जागा ताब्यात येताच जलवाहिनी टाकण्याचे काम युद्धपातळीवर करण्याचे नियोजन आहे. हे काम येत्या 6 महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे, असे अतिरिक्त आयुक्त जांभळे यांनी सांगितले.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news