सोलापूर : नाल्याच्या सफाईसाठी सोलापुरात आंदोलन | पुढारी

सोलापूर : नाल्याच्या सफाईसाठी सोलापुरात आंदोलन

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील शेळगी येथील नालेसफाई करा, या मागणीसाठी भाजपचे माजी नगरसेवक सुरेश पाटील यांनी शेळगी येथे मंगळवारी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी वाहतुकीस अडचण होत असल्यामुळे अखेर माजी नगरसेवक सुरेश पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

शेळगी ब्रिज जवळील नाला महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी स्वच्छ करून घेणे गरजेचे होते. तसे न झाल्याने सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे नाला तुंबून त्या परिसरातील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले. तसेच नाला ओवरफ्लो होऊन पाणी रस्त्यावरून वाहू लागले. यामुळे महापालिकेच्या कामकाजावर संतप्त होत भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक सुरेश पाटील यांनी स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन रास्ता रोको आंदोलन केले. जोपर्यंत महापालिका या नाल्याबाबत ठोस कार्यवाही करत नाही, तोपर्यंत आपण उठणार नाही अशी भूमिका पाटील यांनी घेतली होती.

दरम्यान, पाटील ज्या ठिकाणी आंदोलनास बसले तो रस्ता खूप रहदारीचा व वर्दळीचा असल्याने दोन्ही बाजूला वाहतुकीची कोंडी झाली. त्याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सुरेश पाटील यांना आंदोलन संपवण्यास सांगितले. मात्र ते आंदोलनावर ठाम असल्याने पोलिसांनी त्यांना उचलून गाडीत घालून पोलिस स्टेशनकडे रवाना केले. यामुळे बराच गोंधळ उडाला. त्यानंतर महापालिकेच्या संबंधित खात्याच्या पथकाने जेसीबी लावून, जादा सफाई कामगार नियुक्त करत नालेसफाईचे काम सुरू केले.

Back to top button