शिवछत्रपती पुरस्काराला मंत्रिमंडळ विस्ताराचा अडसर

शिवछत्रपती पुरस्काराला मंत्रिमंडळ विस्ताराचा अडसर

पुणे : राज्य शासनाच्या वतीने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या खेळाडूंसह क्रीडा मार्गदर्शक, संघटक यांना शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित केले जाते. यासंदर्भातील तब्बल तीन वर्षांतील खेळाडू, मार्गदर्शकांचा संपूर्ण अहवाल क्रीडा विभागाच्या वतीने राज्य शासनाला सादर झाला आहे. मात्र, मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये या पुरस्कारांची घोषणा रखडली असल्याचे समोर आले आहे.
शासनाच्या वतीने उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, जिजामाता पुरस्कार, राज्य साहसी क्रीडा, संघटक-कार्यकर्ते, एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार (अपंग खेळाडू) आणि जीवनगौरव पुरस्कार यांचा समावेश असतो.

खेळाडूंसह मार्गदर्शक, संघटक 'वेटिंग'वर

राज्य शासनाच्या वतीने शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची यादी मे महिन्यामध्ये जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर क्रीडा विभागाच्या वतीने हरकती आणि सूचनांसाठी सात दिवसांची मुदतही देण्यात आली होती. या आवाहनानुसार क्रीडा विभागाला तब्बल 195 सूचना व हरकती प्राप्त झाल्या होत्या. या सर्व सूचना व हरकतींचा सविस्तर अहवालही एक महिन्यापूर्वीच शासनाकडे सादर झाला आहे. दरम्यान, कोणत्या वर्षाच्या कोणत्या नावावर हरकत आली आहे याबाबत मात्र, क्रीडा विभागाकडून खुलासा झालेला नाही. परंतु, तीन ते चार चांगल्या सूचना आल्या आहेत. या सूचनांचा सविस्तर अहवाल तयार करण्यात आला असून, तो मान्यतेसाठी शासनाकडे पाठवणार असल्याचे क्रीडा अधिकार्‍यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना सांगितले.

क्रीडा विभागाच्या वतीने शासनाकडे 2019-20, 2020-21 आणि 2021-22 अशी तीन वर्षांची यादी सादर करण्यात आली आहे. यामधील काही नावांवर आलेल्या हरकती आणि सूचनांचा अहवाल ही सादर करण्यात आला आहे. मात्र, पुरस्काराची घोषणा करण्याचे काम शासनस्तरावर आहे. लवकरच याबाबत निर्णय होईल.
– डॉ. सुहास दिवसे, आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचलनालय.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news