

बारामती: बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यामध्ये वाहनचालकांमध्ये जनजागृती केली जात आहे. महिलांची प्रबोधनात्मक रॅलीही काढण्यात आली.
माळेगाव बुद्रुक येथील शरद सभागृहामध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने अभियानाचा शुभारंभ झाला. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम, शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे सचिव धनंजय ठोंबरे, प्राचार्य संदीप शहा आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी माळेगाव नगरपंचायत वेशीपासून शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचा कॅम्पस अशी महिलांची दुचाकी रॅली काढण्यात आली. रस्ता सुरक्षाविषयी पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. त्यामध्ये शिवनगरच्या डिप्लोमा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. वाहतुकीचे नियम पाळणे, हेल्मेट परिधान करणे, सीट बेल्ट लावणे, मद्यपान न करता वाहन चालविणे, अपघात घडल्यानंतर गोल्डन अवर्समध्ये जखमीला उपचारासाठी दाखल करणे आदी मुद्दे पथनाट्याच्या माध्यमातून मांडण्यात आले. रस्ता सुरक्षा विषयक मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे सचिव धनंजय ठोंबरे यांनी रस्ते वाहतूक नियमांचे पालन व सुरक्षितता, शिस्तीचे महत्त्व विषद केले. अभिनेते रामभाऊ जगताप, भरत शिंदे यांनीही रस्ते सुरक्षा व नियमांबाबत जनजागृती केली. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी रस्ता सुरक्षाची चार भागांमध्ये विभागल्याची माहिती दिली. पोस्ट विभागाकडून 550 रुपयांचा विमा कवच घेतल्यास अपघातात मृत्यू झाल्यास अशा व्यक्तीच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांचे विमा कवच मिळते, अशी माहिती त्यांनी दिली. बारामती कार्यालयाने केलेल्या जनजागृतीमळे गतवर्षी अपघातात 15 टक्के तर रस्ते अपघात मृत्यूमध्ये 8 टक्के घट झाल्याचे त्यांनी सांगितले.
सेवानिवृत्त मोटार वाहन निरीक्षक अनिल पंतोजी यांनीही मार्गदर्शन केले. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील निरंजन पुनसे, पद्माकर भालेकर, बजरंग कोरवले, नितीन घोडके, राजकुमार नरसगोंडे, सूरज पाटील, मोहन पाटील, संजय भापकर, सागर ठेंगील, कुणाल राजदीप, रजत काटवटे, प्रज्ञा ओमासे, हेमलता मुळकी, प्रियांका सस्ते आदी अधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.