

पौड: आपणही आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचे यशस्वी आयोजन करू शकतो, हा संदेश जगभर देण्याच्या उद्देशाने मागील तीन महिन्यांपासून अविरतपणे रस्त्यांची कामे करण्यात आली. यामध्ये सुमारे 450 किलोमीटर अंतराचे अत्यंत दर्जेदार रस्ते तयार करण्यात आले असून, पुढील चार वर्षांत 1500 किलोमीटर अंतराचे रस्ते विकसित करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.
कुळे (ता. मुळशी) येथील श्रद्धा गार्डन मंगल कार्यालयात पुणे ग््रॉंड टूर चॅलेंज स्पर्धेच्या निमित्ताने सोमवारी (दि. 5) आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलीस उपायुक्त विवेक पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर, मावळ-मुळशी उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, तहसीलदार विजयकुमार चोबे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्यासह विविध शासकीय अधिकारी व ग््राामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डुडी यांच्या आढावा दौऱ्याची सुरुवात माण येथील जिल्हा परिषद शाळेत क्रीडा, आरोग्य व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या बजाज पुणे ग््रॉंड टूर सायकल स्पर्धा 2026च्या लोगो अनावरणाने झाली. त्यानंतर घोटावडे, दारवली, कोळवण, काशिग या स्पर्धा मार्गांची सविस्तर पाहणी करण्यात आली. पुढे कुळे येथे झालेल्या बैठकीत सुरक्षा, वाहतूक नियोजन व स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
स्पर्धा मार्गावरील गावांतील स्वयंसेवक व पोलीस बांधवांची संयुक्त बैठक घेतली जाईल. त्यामुळे समन्वय वाढून स्पर्धेच्या दिवशी नियोजन अधिक सोपे होईल.
संदीपसिंह गिल्ल, पोलिस अधीक्षक, पुणे ग््राामीण
या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी या भागाची निवड केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांचे आभार. या स्पर्धेच्या निमित्ताने झालेला रस्त्यांचा कायापालट म्हणजे शाश्वत विकासाचा नवा मार्ग आहे. स्पर्धकांच्या स्वागतासाठी पारंपरिक खेळ, लेझीम, कुस्ती, वारकरी खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल.
शंकर मांडेकर, आमदार
मुळशी तालुक्यात 30 किलोमीटर अंतरासाठी सुमारे 400 पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. स्पर्धेच्या दिवशी मार्गावर बॅरीकेडिंग करून रस्ते बंद ठेवले जातील. दूध व्यावसायिकांनी पूर्वनियोजन करावे. शासकीय व खासगी शाळांना सुटी देण्यात येणार असून, मार्गावरील हॉटेल व बीअर बार बंद ठेवण्यात येणार आहेत.
विजयकुमार चोबे, तहसीलदार