

बापू जाधव
निमोणे: विज्ञानयुगात वावरणारी माणसं, पुरोगामी विचारांचा डंका पिटणारा समाज आणि ‘आमच्या गावात तसं काही राहिलं नाही’ असा आत्मविश्वास मिरवणारी मंडळी, हे सारे दावे किती पोकळ आहेत, याचं विदारक दर्शन जिल्ह्यातील एका गावात पुन्हा एकदा घडलं. गावाच्या विकासासाठी, वैभवात भर घालणारी एक चांगली वास्तू उभी राहू नये, यासाठी केवळ जात हा मुद्दा पुढे करून ती योजना मोडीत काढण्यात आली. जात नावाचा कॅन्सर आजही समाजाच्या मुळाशी किती खोलवर रुजलेला आहे, हे या घटनेतून ठळकपणे समोर आलं आहे.
जिल्ह्यातील एका गावात वरवर पाहता खेळीमेळीचे वातावरण आहे. गावगाड्याच्या राजकारणात असणारी नेहमीची ईर्षा, गट-तट, मतभेद हे सगळं खेडोपाडी आढळणाऱ्या स्वरूपात तिथंही आहे. एका जातीचा संख्याबळाने मोठा गट आणि त्याच गटातील अंतर्गत मतभेद, यामुळे छोट्या-छोट्या जातसमूहांना सोबत घेऊन सत्ता व प्रभाव टिकवण्याची रणनीती प्रत्येक गटाकडून वापरली जाते. शिक्षण, उद्योग-व्यवसाय, नोकरी आणि शेतीमुळे काही जातसमूहांतील ठराविक कुटुंबे आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली आहेत. अशाच एका भटक्या-विमुक्त जातसमूहातील कुटुंबाने प्रचंड सामाजिक व आर्थिक संघर्ष झेलत पंचक्रोशीत आपला दबदबा निर्माण केला. गावातील निर्णय प्रक्रियेत या कुटुंबाचा सहभाग आहे, असं वरवर तरी चित्र निर्माण झालं होतं.
दरम्यान, गावाच्या विकासासाठी किंवा गावाच्या सौंदर्यात भर घालणारी एखादी वास्तू लोकवर्गणीतून किंवा वैयक्तिक खर्चातून उभारावी, असा विचार काही महिन्यांपूर्वी ग््राामसभेत मांडण्यात आला. मात्र, चर्चा होऊनही पुढे कोणीच प्रत्यक्षात पुढाकार घेण्यास तयार होत नव्हतं. याच पार्श्वभूमीवर त्या संघर्षातून उभ्या राहिलेल्या कुटुंबाने पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला. गावात सर्वानुमते ठरलं की, जर कोणी वैयक्तिक खर्चातून सार्वजनिक उपयोगाची वास्तू उभारत असेल, तर त्या वास्तूच्या दर्शनी भागावर आपल्या पूर्वजांचं नाव लावण्यास हरकत नसावी. आपल्या कुटुंबाच्या संघर्षाची ओळख जपण्यासाठी आणि गावासाठी काहीतरी चांगलं करण्याच्या उद्देशाने या कुटुंबाने खर्च करण्याची तयारी दर्शवली.
सुरुवातीला गावगाड्यातील कर्त्या-धर्त्यांकडून या निर्णयाला होकारही मिळाला. ’चांगली गोष्ट आहे, काही अडचण नाही,’ असे सूर ऐकू आले; मात्र ही बाब विरोधी गटातील एका व्यक्तीच्या कानावर गेल्यानंतर चित्र पूर्णतः बदललं. राजकीय वैर, गट-तटांचे वाद असले तरी केवळ जात या मुद्द्यावरून त्या व्यक्तीचा संताप अनावर झाला. त्याने आपल्या गटातील काहींना गाठत, ’गावाच्या दर्शनी भागात त्यांना बांधायला कसं काय देता? पाहुणेरावळे तोंडात शेण घालतील! गाव कुणाचं आहे, थोडं तरी भान ठेवा,’ अशा शब्दांत चिथावणी दिली. काही वेळातच सुरुवातीचा होकार विरोधात बदलला.
क्षणात सगळ्यांचे पुरोगामी मुखवटे गळून पडले. केवळ जातीच्या अहंकारामुळे गावाच्या विकासासाठी उभी राहू शकणारी एक चांगली वास्तू मोडीत काढण्यात आली. ’आपल्या गावात तसं काही राहिलं नाही’, असं सांगणारेच प्रत्यक्षात किती टोकाचे प्रतिगामी आहेत, याचं हे बोलकं उदाहरण ठरलं आहे. ही घटना केवळ एका वास्तूचा प्रश्न नाही, तर जातीच्या बाबतीत समाज किती खोलवर आजही विभागलेला आहे, याचं गंभीर आणि दुर्दैवी चित्र आहे. जात नावाचा कॅन्सर आजही आनुवंशिक पद्धतीने समाजात ठाण मांडून बसलेला असल्याचं या घटनेतून स्पष्ट झालं.