

नारायणगाव: वारंवार प्रयत्न करून देखील जातीचा दाखला मिळत नसल्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही. आपल्याला कुणीच सहकार्य करत नाही, हा विचार करत आर्वी येथील एका महिलेने टेलिफोनच्या 150 फूट उंचीच्या टॉवरवर तब्बल 14 तास चढून आपल्याला न्याय मिळावा या मागणीसाठी या महिलेने ‘शोले’तील ‘वीरू’ होत आंदोलन केले. हा प्रकार आर्वी (ता. जुन्नर) येथे मंगळवारी (दि. 6) घडला. सविता बापू कांबळे (वय 38) असे आंदोलन करणाऱ्या महिलेचे नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, आर्वी येथे सविता बापू कांबळे या महिला आपल्या कुटुंबासह गेले अनेक वर्ष राहतात. त्यांचे पती बापू कांबळे यांच्याकडे जातीचा दाखला आहे, परंतु, सविता यांचे माहेर कर्नाटक राज्यातील बेळगाव येथील असल्याने त्यांना दाखला मिळत नसल्यामुळे मुलांच्या शिक्षणाची गैरसोय होत होती. सरकारदरबारी अनेक वेळा खेटा मारल्या, परंतु प्रश्न मार्गी लागला नाही. मुलांच्या आयुष्याचे काय होणार या चिंतेत या महिलेने घरापासून 500 मीटर अंतरावर असलेल्या दूरसंचार विभागाच्या 150 फूट उंचीच्या टॉवरवर चढून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अनोखे आंदोलन केले.
दरम्यान एक महिला टॉवरवर चढली असल्याचे स्थानिकांनी सरपंच व पोलिस पाटील तसेच नारायणगाव पोलिसांना कळवले. नारायणगावचे सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण सपांगे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या महिलेशी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु मला कोणाशी बोलायचं नाही, मला थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलायचं आहे, माझ्यावर अन्याय होतोय असे म्हणत या महिलेने पोलिस यंत्रणेशी बोलण्याचे टाळले. तद्नंतर पोलिसांनी तत्काळ रेस्क्यू टीमशी संपर्क साधून त्यांना पाचारण केले. रेस्क्यू टीमने या महिलेला खाली उतरल्यानंतर पोलिसांनी त्यांना ग््राामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
या महिलेवर नारायणगाव येथील सरकारी ग््राामीण रुग्णालयात उपचार सुरू असून महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या महिलेची भाजपा नेत्या आशाताई बुचके यांनी भेट घेऊन तुमचा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न करू, असे सांगितले.
अभियांत्रिकी महाविद्यालय फीशिवाय दाखला देत नसल्याचा आरोप
या महिलेचा मुलगा जुन्नर तालुक्यातील एका खासगी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. फी भरल्याशिवाय शाळा सोडल्याचा दाखला देणार नाही असा देखील तगादा या शिक्षण संस्थेने लावला असल्याने पैसे आणायचे कुठून, याचे देखील टेन्शन असल्याचे महिलेने सांगितले.
संबंधित महिलेने दाखला मिळावा याबाबत या कार्यालयाशी संपर्क साधलेला नाही. तथापि त्यांना हवा असलेला जातीचा दाखला कागदपत्र पाहून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल.
सुनील शेळके, तहसीलदार, जुन्नर