

बारामती: इन्स्टाग्रामवरून संपर्क साधत दोन लाख रुपयांची खंडणी मागत ती देण्यास नकार दिल्यावर उद्योजकाच्या बंगल्याबाहेर वाहनावर गोळीबार केल्याच्या प्रकरणात बारामती तालुका पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेने दोघा अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे. शनिवारी (दि. २१) सायंकाळी बारामतीत घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली होती.
या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात राजन धननंजय कोळेकर (रा. अनन्या व्हिला बंगला, शिवशंभोनगर, नक्षत्र गार्डनमागे, तानाईनगर एमआयडीसी, बारामती) यांनी फिर्याद दिली होती. कोळेकर यांचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये बंड्या ऊर्फ अक्षय काळे व अन्य दोघांचा समावेश होता.
शनिवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास इन्स्टाग्रामवरून फिर्यादीकडे या तिघांनी २ लाख रुपये खंडणीची मागणी केली होती. बीके कंपनी या नावाने ही खंडणी मागितली गेली होती. फिर्यादीने ती देण्यास नकार दिल्याने सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास केशरी रंगाच्या दुचाकीवरून हे तिघे त्यांच्या बंगल्याजवळ आले. दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणाने बंगल्याचे गेट उघडले आणि तो पुन्हा दुचाकीवर जावून बसला. त्यानंतर ते तिघे तेथून जात असताना दुचाकीवर मध्यभागी बसलेल्या युवकाने फिर्यादीच्या डिफेंडर (एमएच ४२ बीव्ही ७४७४) च्या पाठीमागे एक गोळी फायर केली होती. त्यानंतर पाठीमागे बसलेल्याने पार्किंगच्या दिशेने एक गोळी फायर करत ते तेथून निघून गेले होते. या प्रकरणी शस्त्र अधिनियमासह, खंडणी व अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेमुळे बारामतीत खळबळ उडाली होती. उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम, पोलिस निरीक्षक नारायण पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. या प्रकरणी पाच पथके तपासासाठी तैनात करण्यात आली. अवघ्या आठ तासांत पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेले दोन पिस्तूल जप्त करण्यात आले आहेत. या दोघांनी बंड्या काळे याच्यासोबत हा गुन्हा केल्याचे तपासात पुढे आले आहे. तो अद्याप फरार आहे.
मुख्य संशयित पूर्वीचा कर्मचारी
या प्रकरणातील मुख्य संशयित बंड्या ऊर्फ अक्षय काळे हा २०१५ ते २०१९ या कालावधीत राजन कोळेकर यांच्या कन्स्ट्रक्शनच्या कामावर बाॅब कट मशिन चालवत होता. फिर्यादी कोळेकर व तो एकमेकांच्या ओळखीचे आहेत. फिर्यादीबाबतची माहिती बंड्या याच्याकडे होती. त्यातून त्याने खंडणी मागण्याचा प्लॅन केला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.