

राजेंद्र गलांडे
बारामती: राज्याच्या राजकारणात आपल्या कार्यशैलीने दबदबा निर्माण केलेल्या दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर बारामतीतील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. शहरात धारदार कोयत्याने वार करणे, खंडणी मागणे, गोळीबार करणे असे प्रकार नित्याचे झाले आहेत. पोलिसांकडून या घटनांचा तपास केला जात असला तरी सुरक्षित, शांत बारामतीच्या प्रतिमेला गुन्हेगारीचे गालबोट लागल्याचे बोलले जात आहे.
राज्याच्या राजकारणात आसताना अजित पवार यांच्या कार्यशैलीची एक वेगळी ओळख होती. त्यांच्या निधनानंतर बारामतीतील राजकीय आणि प्रशासकीय वातावरण बदलले आहे. विकासाचे माॅडेल म्हणून ओळख असलेल्या बारामतीत आता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गोळीबार, खंडणी, मारामारी, कोयत्याने वार, दहशत माजविण्याचे प्रकार या घटनांमळे शहराच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
एकेकाळी शिस्त, नियोजन आणि सुरक्षिततेसाठी ओळखल्या जाणाऱ्या बारामतीत गुन्हेगारी प्रवृत्तींचे धाडस वाढत चालले असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. किरकोळ वादातून मारामारी, पूर्ववैमनस्यातून जीवघेणे हल्ले, टोळक्यांकडून दहशत निर्माण करण्याचे प्रकार, आर्थिक वादातून हल्ले, खंडणीचे प्रकार समोर येत असल्याने शहरातील शांतता धोक्यात येत असल्याचे चित्र आहे.
अल्पवयीनांचा सहभाग चिंतेचा
शहर व एमआयडीसी परिसरात अलिकडील काळात घडलेल्या अनेक घटनांमध्ये अल्पवयीनांचा सहभाग ही चिंतेचा भाग बनली आहे. १६ ते १८ या वयोगटातील अनेक तरुण भाईगिरीकडे वळले आहेत. सोशल मीडियावरून निर्माण होणारे वाद, उद्योजकांकडे खंडण्या मागणे, बेकायदा वसुली करणे, पिस्तूल बाळगणे, कोयत्याने हल्ले करणे असे प्रकार त्यांच्याकडून घडत आहेत. अल्पवयीनांच्या या सहभागाबाबत आता पालकांनीच सतर्क होणे आवश्यक बनले आहे.
राजकीय नेतृत्वाकडून अपेक्षा
बारामतीत एखादी घटना घडल्यानंतर त्या विषयी द्विट करून येथील राजकीय मंडळी आपले हात झटकू पाहत आहेत. मुळात नागरिकांच्या सुरक्षिततेचा हा विषय फक्त ट्विट करून किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन सुटणारा नाही. त्यासाठी या राजकीय मंडळींनी फिरून सुरक्षिततेची भावना त्यांना निर्माण करावी लागेल, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
राणा सूर्यवंशी प्रकरणाचे गौडबंगाल कायम
उद्योजक राणा सूर्यवंशी कथीत हल्ल्याचे प्रकरण पुढे सरकायला तयार नाही. त्या प्रकरणातील आरोपींचा अजूनही शोधच घेतला जात आहे. प्रकरणाची नेमकी वस्तुस्थिती आजही समोर यायला तयार नाही. त्यात शहरात मारामाऱ्या, चोऱ्या, महिलांवरील अत्याचार हे प्रकारही आता नित्याचेच झाले आहेत. शहरातील व्यापारी, नागरिक, महिला, विद्यार्थिनी, सामान्य नागरिकांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचा आरोपही होत आहे.
गुन्हेगारांना धाक उरलाय का?
गुन्हा घडल्यानंतर पोलिसांकडून आरोपींना अटक करण्यासह अन्य कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या जात आहेत. मात्र, एकूणच गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी केवळ गुन्हा दाखल करणे पुरेसे राहिलेले नाही. गुन्हा घडण्यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई, सराईत गुन्हेगारांवर वचक, टोळ्यांच्या हालचालींवर लक्ष आणि संवेदनशील भागात गस्त आवश्यक आहे. गुन्हेगारांना कायद्याची भीती वाटली पाहिजे, अन्यथा सामान्य नागरिकांच्या मनातील सुरक्षिततेची भावना आता कमी होऊ लागली आहे.
दादांचा दरारा पदोपदी आठवतोय
बारामती आणि येथील कायदा-सुव्यवस्थेबाबत नेहमी दक्ष राहणाऱ्या अजित पवारांचा दरारा आता पदोपदी आठवत आहे. त्यांनी प्रशासकीय शिस्तीची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनानंतर मोठी पोकळी निर्माण झाली आहे. बारामतीत एखादी अप्रिय घटना घडल्यानंतर भर सभेत, लोकांसमोर ते अधिकाऱ्यांची हजेरी घेत. त्यामुळे त्यांच्या दौऱ्यापूर्वी आपल्याविषयी एखादी तक्रार होईल का? या भीतीनेच अधिकाऱ्यांना घाम फुटायचा. आता ती परिस्थिती राहिलेली नाही.