
बारामती: उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून एमआयडीसीमध्ये नव्याने अद्ययावत वाहन तपासणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रावर आता सर्व व्यावसायिक वाहनांची फिटनेस तपासणी अधिक कडक पद्धतीने सुरू करण्यात आली आहे. ब्रेक टेस्ट, हेडलाईट टेस्ट, धूर तपासणी, सस्पेन्शन तसेच वाहनाच्या बॉडीचे मोजमाप ऑटोमेटेड मशीनद्वारे केले जाणार आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी दिली.
परिवहन विभागामार्फत व्यावसायिक वाहनांसाठी योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण दर दोन वर्षांनी आठ वर्षांपर्यंत आणि दरवर्षी आठ वर्षांपेक्षा जुन्या वाहनांसाठी केले जाते. वैयक्तिक वाहनांची फिटनेस चाचणी नोंदणीच्या नूतनीकरणाच्या वेळी १५ वर्षांनंतर केली जाते. नोंदणीचे नूतनीकरण लागू झाल्यास दर पाच वर्षांनी चाचणी होते. त्यासाठी मोटार वाहन निरीक्षक व सहा. मोटार वाहन निरीक्षक यांचेमार्फत योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचे कामकाज केले जाते.
सदर योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी विविध तपासणी करण्यात येते. वाहनांच्या अयोग्य स्थितीमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी तसेच मानवी त्रुटी तसेच शून्य मानवी हस्तक्षेपाशिवाय वाहनांची सुस्थिती निश्चित करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने स्वयंचलित चाचणी केंद्र स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
बारामतीत ५ एकर क्षेत्रावर हे केंद्र उभारले आहे. त्यासाठी १३ कोटी २० लाखाचा खर्च झाला. नवीन केंद्रात आता शून्य मानवी हस्तक्षेप असेल. शिवाय वाहनांची तपासणी अधिक काटेकोर पद्धतीने होईल. त्यामुळे अयोग्य स्थितीतील वाहनाला फिटनेस सर्टीफिकेट मिळणार नाही. परिणामी अपघात टाळण्यासाठी प्रदूषणातही घट होणार आहे.
या केंद्रात तीनचाकी,चारचाकी वाहनांसह अवजड वाहनांची तपासणीची साेय आहे.या तपासणीसाठी अपाॅइंटमेंट घेणे आवश्यक आहे.तपासणी मध्ये वाहनांचा वेग, ब्रेक, सस्पेन्शन, स्टेअरींग, चाकांची स्थितीसह व्हर्चुअल इन्स्पेक्शन केले जाते.
आजवर नियमांची पुर्तता करणाऱ्या १४० व्यावसायिक वाहनांना या केंद्रातून फिटनेस प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. तत्कालीन उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नातून या केंद्राला मंजुरी मिळाली होती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी तद्नंतर पाठपुरावा केला. परिणामी हे काम वेळेत पूर्ण झाले, असेही निकम यांनी स्पष्ट केले.