

आळेफाटा: जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे साडेनऊ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी (दि. २०) रात्री ग्रामस्थांनी मूक मोर्चा काढला. या मोर्चाला नागरिक, महिला आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी झालेल्या शोक सभेत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. ग्रामस्थांनी मेणबत्त्या पेटवत चिमुरडीला श्रद्धांजली वाहिली.
मळगंगा माता मंदिरापासून या मूक मोर्चाला सुरुवात झाली. बाजारपेठेतून मार्गक्रमण करत मोर्चा ग्रामपंचायत कार्यालयाजवळ पोहोचला. सहभागी नागरिक आणि महिलांच्या हातात घटनेचा निषेध करणारे फलक होते. या वेळी ‘चिमुरडीला न्याय मिळालाच पाहिजे’,’आरोपीला फाशी झालीच पाहिजे’ अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या.
पिंपळवंडी येथे मंगळवारी (दि. १८) एका २५ वर्षीय तरुणाने साडेनऊ वर्षींय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेचे तीव्र पडसाद पिंपळवंडीसह संपूर्ण जुन्नर तालुक्यात तसेच राज्यात उमटले. घटनेच्या निषेधार्थ दुसऱ्याच दिवशी ग्रामस्थांनी पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.
त्यानंतर सलग दोन दिवस पिंपळवंडी गाव बंद ठेवण्यात आले. विविध महिला संघटनांनीही या घटनेचा तीव्र निषेध केला. तसेच, जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊन आरोपीला फाशी देण्याची मागणी केली. दरम्यान, मूक मोर्चानंतर झालेल्या शोक सभेत माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शरद लेंडे यांनी पिंपळवंडीच्या इतिहासातील ही अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर घटना असल्याचे सांगितले.
पीडित कुटुंबीयांचा आक्रोश
शोक सभेत पीडित कुटुंबीयांनी व्यक्त केलेला आक्रोश उपस्थितांचे मन हेलावून गेला. “आमची लेक त्या नराधमामुळे गेली. त्याला तडफडून मरताना आम्हाला पाहायचे आहे. आम्हीही पालक आहोत, तुम्हालाही मुली आहेत; तुम्ही तुमच्या मुलींना जपा,” अशा शब्दांत कुटुंबीयांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांचा आक्रोश ऐकताना उपस्थित नागरिकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.