

पुणे : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनात शिक्षण, बांगलादेशी घुसखोरी, नैसर्गिक आपत्ती, विभाजनवादी शक्ती आणि समाज परिवर्तन या विषयांवरील पाच प्रमुख प्रस्ताव मंजूर करण्यात आले.
देशभरात 'वसतिगृह सर्वेक्षण अभियान' आणि 'परिसर चलो अभियान' राबवले जाणार असून, 'वंदे मातरम्' गीताच्या 150 वर्षपूर्तीनिमित्त अभाविप सार्थशती वर्ष साजरे करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. डेहराडून येथे तीनदिवसीय अधिवेशन पार पडले.
तीनदिवसीय अधिवेशनाची माहिती सोमवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली. या वेळी प्रदेशमंत्री अथर्व कुलकर्णी, प्रदेश सहमंत्री ओम मालुंजकर, राष्ट्रीय कार्यकारिणी परिषद सदस्य निकिता डिंबर व पुणे महानगर मंत्री राधेय बाहेगव्हाणकर हे उपस्थित होते. अधिवेशनात राणी अब्बक्का कलश यात्रा, भगवान बिरसा संदेश यात्रा, श्री गुरू तेग बहादूरजींचा पवित्र जल-कलश यात्रांना विशेष स्थान देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
अधिवेशनात नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. रघुराज किशोर तिवारी आणि पुनर्निर्वाचित राष्ट्रीय महामंत्री डॉ. वीरेंद्रसिंह सोलंकी यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. या वेळी प्रा. यशवंतराव केळकर युवा पुरस्कार 'स्माईल रोटी बँक फाउंडेशन' चे संस्थापक श्रीकृष्ण पाण्डेय (गोरखपूर) यांना उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.