

पुणे : श्रमिकांचे ''बाबा'' अर्थात कष्टकरी, कामगारांचे नेते, ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या निधनाने सामाजिक चळवळींचा आधारवड हरपला आहे, अशी शोकभावना व्यक्त करून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ सामाजिक नेते बाबा आढाव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
आढाव यांचे निधन ही महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळींची भरून काढता येणार नाही अशी मोठी हानी झाली आहे, असेही मुख्यमंत्री यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, महाराष्ट्राला लाभलेल्या सामाजिक चळवळींचा वारसा पुढे नेण्यासाठी अखंड आणि व्रतस्थपणे क्रीयाशील राहणाऱ्यांमध्ये बाबा आढाव अग्रभागी राहिले. व्यवसायाने डॉक्टर असूनही बाबांनी संपूर्ण आयुष्य असंघटित क्षेत्रातील कष्टकऱ्यांसाठी वेचले. कचरावेचकांपासून ते हमाल, रिक्षाचालक बांधकाम मजूर, घरेलु कामगार यांचे संघटन त्यांना न्याय, सामाजिक सुरक्षा आणि सन्मान मिळवून देण्यासाठी समर्पित केले.
'हमाल पंचायत, रिक्षा पंचायतच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्याला संस्थात्मक असे रूप दिले. 'एक गाव एक पाणवठा' या त्यांच्या मोहिमेने सामाजिक समतेचा आगळा प्रयोग राबविला गेला. त्यांचा ''कष्टाची भाकर'' हा उपक्रम सामाजिक क्षेत्रातील संवेदनशीलतेचे आगळे उदाहरण ठरले. आपल्या तत्वांशी ठाम, असणाऱ्या बाबांची विचार मांडण्याची शैली परखड होती. बाबा आढाव यांचे निधन अशा अनेक उपक्रम, सामाजिक चळवळींना, त्यातील कार्यकर्ते यांना पोरके करून गेले आहे.
आम्ही या सर्वांच्या तसेच आढाव कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असून, त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करतो. श्रमिक चळवळींचा आधारवड, ज्येष्ठ सामाजिक नेते बाबा आढाव यांना व्यक्तीश: तसेच तमाम महाराष्ट्राच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.