

पुणे: आयुर्वेदिक उपचार केंद्राच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करीत गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक कक्षाने तिघांवर कारवाई केली आहे. याप्रकरणी एका विधिसंघर्षित मुलासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
स्पाचालक विद्या मदन मंडले (रा. कात्रज), प्रमोद बबन खाटपे (रा. आंबेगाव) यांच्याविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिस हवालदार इमानखान नदाफ यांनी फिर्याद दिली आहे. मंगळवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. या वेळी रोकड, मोबाईल आणि इतर साहित्य असा 23 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आनंदनगर-सिंहगड रोड परिसरातील मनाली आयुर्वेदिक उपचार केंद्रात वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. त्यानुसार बनावट ग््रााहक पाठवून खात्री केली.
त्या वेळी तेथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे समोर आले. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक आशालता खापरे पोलिस कर्मचारी ईश्वर आंधळे, बबन केदार, किशोर भुजबळ, वैशाली खेडेकर यांच्या पथकाने छापा टाकला. या वेळी एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली.
आरोपी पीडित महिलेला पैशाचे आमिष दाखवून तिच्याकडून मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करून घेत होते. त्यातून मिळालेल्या पैशातून स्वतःची उपजीविका भागवत होते. या वेळी स्पा मॅनेजर म्हणून काम पाहणाऱ्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले, तर दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.