

पुणे: हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक 16 मधील ड प्रवर्गातील उमेदवारांच्या क्रमांकातच बदल झाल्याने प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे या प्रवर्गाची निवडणूकच रद्द करा, असा पवित्रा उमेदवारांनी घेतल्याने गोंधळ निर्माण झाला आहे.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीत हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक 16 मधील प्रवर्ग ड मध्ये प्रशासनाचा गलथान कारभार पुढे आला आहे. ड प्रवर्गात उमेदवार क्रमांक 2 मध्ये उबाठाचे उमेदवार विजय देशमुख तर उमेदवार क्रमांक 3 मध्ये भाजपचे मारुती तुपे यांची नावे दि. 3 जानेवारी रोजी प्रसिध्द केलेल्या यादीत देण्यात आली होती.
परंतु, प्रशासनाने ही चूक लक्षात येताच दि. 5 जानेवारी रोजी त्यामध्ये बदल करीत उमेदवार क्रमांक 2 वर भाजपचे मारुती तुपे तर उमेदवार क्रमांक 3 वर उबाठाचे विजय देशमुख यांच्या नावाचा बदल केला आहे. ही बदलेली यादी संकेतस्थळावर 5 जानेवारी रोजी प्रसिध्द करण्यात आली तर उमेदवारांना दि. 7 जानेवारी रोजी कळविण्यात आली. या झालेल्या प्रकारामुळे उमेदवारांनी गेल्या चार दिवसांमध्ये उमेदवार क्रमांक छापलेले पत्रक तसेच रिक्षावर केलेल्या प्रसिध्दीसाठीचा खर्च वाया गेला आहे. निवडणूक प्रशासनाकडून ही चूक मान्य झाली असली तरी उमेदवारांना मात्र त्याचा मनस्ताप झालेला आहे. त्यांनी या प्रभागातील ड प्रवर्गाची निवडणूकच रद्द करा, अशी भूमिका घेतल्याने यावर निवडणूक आयोग काय तोडगा काढतो हे पाहणे गरजेचे आहे.
उमेदवारांच्या जाहीर केलेल्या यादीमध्ये माझा दोन नंबर तर भाजपच्या उमेदवाराचा तीन नंबर होता. मात्र, त्यांच्या चार दिवसांनी लक्षात आले असून त्यांनी बुधवारी हा अनुक्रमांक बदलला आहे. ही यादी 5 जानेवारी रोजी संकेतस्थळावर जाहीर केली. मात्र उमेदवारांना कळवले नाही. निवडणूक आयोगाने ही चूक मान्य केली आहे. आमचा नंबर तोच ठेवा अन्यथा निवडणूक रद्द करा.
विजय देशमुख, उमेदवार, प्रभाग क्रमांक 16
प्रभाग क्रमांक 16 मधील ड प्रवर्गात उमेदवारांच्या जाहीर केलेल्या यादीमध्ये नजरचुकीने क्रमांक बदलला गेला होता. ही बाब लक्षात येताच त्यामध्ये तातडीने बदल करून संकेतस्थळावर तसेच उमेदवारांच्या ग््रुापमध्ये टाकण्यात आले होते. आता यामध्ये अधिक काही बदल होऊ शकत नाही.
गणेश मारकड, निवडणूक निर्णय अधिकारी