

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रक्रियेला 22 डिसेंबरपासून सुरुवात झाली असून, कार्यक्रमानुसार इच्छुक उमेदवारांना 11 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज वितरित केले जाणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मुख्य निवडणूक अधिकारी ॲड. प्रताप परदेशी यांनी दिली. त्यांनी बुधवारी (दि. 7) निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.
11 ते 16 जानेवारी या कालावधीत कार्यालयीन वेळेत इच्छुकांना उमेदवारी अर्ज वितरित केले जाणार आहेत. 19 ते 22 जानेवारी या कालावधीत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्जांची छाननी होऊन वैध उमेदवारी अर्ज 23 जानेवारी रोजी जाहीर केले जाणार आहेत.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 25 जानेवारी आहे. 27 जानेवारी रोजी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. 5 फेब्रुवारीपासून मतदानास पात्र आजीव सभासदांना मतपत्रिका पोस्टाने पाठविल्या जाणार आहेत, त्यांनी मतदान करून त्या 13 मार्चपर्यंत परत पाठवायच्या आहेत.
15 मार्च रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. निवडणूक पार पाडण्यासाठी निर्वाचन मंडळातील सहायक निवडणूक अधिकारी गिरीश केमकर, संजीव खडके आणि प्रभा सोनवणे सहकार्य करीत आहेत, असेही ॲड. परदेशी यांनी सांगितले.