

अशोक मोराळे
पुणे: प्रथमेश आढळ आणि त्याच्या साथीदारांनी अमनसिंग गचंड याला अतिशय निर्घृणपणे संपविल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. खून करण्यापूर्वी आरोपींनी अमनसिंगला शेवटी इच्छा विचारली. त्याने सिगारेट आणि बिअरची मागणी केली. त्यानंतर त्याला खड्डा खोदायला लावून त्यात पुरले. परत बाहेर काढून सर्जकिल ब्लेडने आणि कोयत्याने त्याचा गळा चिरून, डोके दगडाने ठेचले. खेड शिवापूर येथील वर्तुमुख मंदिराच्या डोंगर परिसरात तीन ते चार तास हा खुनी खेळ सुरू होता.
अमनसिंग सुरेंद्रसिंह गचंड (वय 17, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत पाच जणांना पकडले असून, त्यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. तर हनिट्रॅपच्या माध्यमातून अमनसिंग याला बोलावून घेणाऱ्या तरुणीसह तब्बल अकरा जणांविरुद्ध विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रथमेश चिंधू आढळ (वय 19, रा. उत्तमनगर), नागेश बालाजी धबाले (वय 19, रा. शिवणे) या दोघांना अटक केली असून, न्यायालयाने 9 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 29 डिसेंबर रोजी हा प्रकार घडला आहे. दरम्यान, बुधवारी (दि. 7) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अमनसिंग याचा मृतदेह पोलिसांनी खेड शिवापूर परिसरातील डोंगरातून पुरलेल्या खड्ड्यातून बाहेर काढला. नऊ दिवसांनंतर मृतदेहाची अवस्था बिकट झाली होती. त्यामुळे त्याच ठिकाणी शवविच्छेदन केल्याचे पोलिस उपायुक्त सीएच रजनीकांत यांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमेश आढळ आणि त्याच्या साथीदारांनी अतिशय शांत डोक्याने अमनसिंगचा काटा काढल्याचे प्रथमदर्शी दिसून येते. सप्टेंबर 2025 मध्ये अमनसिंग आणि प्रथमेश यांच्यात वाद झाले होते. अमनसिंग याने केलेल्या मारहाणीत प्रथमेशच्या हाताला गंभीर जखम झाली होती. त्यामुळे तो त्याच्यावर चिडून होता. हा प्रकार घडल्यानंतर अमनसिंग विश्रांतवाडी परिसरात राहण्यास आला होता. परंतु, तो कोठे राहतो, हे प्रथमेशला माहिती नव्हते. मात्र, अमनसिंग सतत इन्स्टाग््राामवर ॲक्टिव्ह असल्याचे प्रथमेशने पाहिले. तो वेगवेगळे स्टेटस ठेवत असे. हा प्रकार प्रथमेशच्या जिव्हारी लागला होता. त्यातूनच त्याने आपल्या साथीदारांना सोबत घेऊन अमनसिंगला आपल्या परिसरात खेचून आणण्याची योजना तयार केली. त्यासाठी धबालेच्या मैत्रिणीची मदत घेतली. तिला आरोपींनी सांगितले की, आम्ही अमनसिंगला फक्त धमकावणार आहोत. त्यामुळे तू आमच्यासाठी इन्स्टाग््राामवर त्याच्यासोबत मैत्री कर. अमनसिंग अलगद प्रथमेशने लावलेल्या सापळ्यात अडकला.
29 डिसेंबरचा तो दिवस, इन्स्टाग््राामवरील मैत्रिणीच्या हनिट्रॅपमध्ये अडकलेला अमनसिंग तिने सांगितलेल्या ठिकाणी दुचाकीवर आला. खेड शिवापूर येथील वर्तुमुख मंदिराच्या डोंगराचा तो परिसर. दोघांनी मंदिरात दर्शन घेतले. तेवढ्यात धबाले तेथे आला. तो अमनसिंगच्या खांद्यावर हात टाकून काही अंतर पुढे चालत गेल्यानंतर दुचाकीवर बसवून त्याला पुढील डोंगरात घेऊन गेला. तेथे अगोदरच प्रथमेश आढळ आणि त्याचे इतर साथीदार हजर होते. अमनसिंगला आपण प्रथमेशच्या जाळ्यात अडकल्याचे लक्षात आले. सुरुवातीला त्यांच्यात बोलाबोली झाली. अमनसिंगला आता प्रथमेश आपल्याला जिवंत सोडणार नाही, याची कल्पना आली होती. त्यामुळे तो देखील मला मारून टाका, असे म्हणत होता. प्रथमेश आणि त्याच्या साथीदारांनी अमनसिंगला शेवटची इच्छा काय? असे विचारले. त्या वेळी त्याने बिअर आणि सिगारेट मागितली. आरोपींनी बिअर, सिगारेट आणून त्याला दिली.
त्यांनी अमनसिंगला स्वतःचा खड्डा खोदायला लावला. त्याला खड्ड्यात पुरून टाकले. आरोपींच्या लक्षात आले, आपण जर याला खड्ड्यात पुरले तर तो कदाचित बाहेर पडेल. त्यामुळे त्यांनी अमनसिंगला त्यातून बाहेर काढले. आरोपीपैकी एकाजवळ सर्जकिल ब्लेड होते. त्याने अमनसिंगच्या गळ्यावर मारले. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. परंतु, वार खोलवर गेला नसल्याचे आरोपींच्या लक्षात आले. यानंतर त्याच्या गळ्यावर कोयत्याने वार करून, डोके दगडाने ठेचले. अमनसिंग मेल्याची खात्री झाल्यानंतर आरोपींनी त्याचा मृतदेह त्याच खड्ड्यात पुरून टाकून पळ काढला.
सकाळी घरातून बाहेर पडलेला अमनसिंग रात्री उशिरापर्यंत घरी आला नाही. त्याचा फोन तर लागत होता. मात्र, तो उचलला जात नव्हता. त्याची आई अनिता यांनी सर्वत्र शोधाशोध केली. परंतु, त्याचा थांगपत्ता लागला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या आईने विश्रांतवाडी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. गुन्हे शाखा युनिट-3 च्या पथकाने समांतर तपास करीत असताना बेळगाव, कर्नाटक येथून मुख्य सूत्रधार प्रथमेश आढळ आणि त्याचा साथीदार नागेश धबाले या दोघांना आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. चौकशीत प्रथमेशने पूर्वीच्या वादातून अमनसिंगचा साथीदारांच्या मदतीने खून करून मृतदेह खेड शिवापूरच्या डोंगरात पुरल्याची कबुली दिली.
आत्तापर्यंत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपींनी अमनसिंगचा खून करण्यापूर्वी त्याची शेवटची इच्छा विचारली. त्याला खड्डा खोदायला लावला. धारधार शस्त्राने वार केल्यानंतर डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह खड्ड्यात पुरून आरोपी फरार झाले होते. पूर्वीच्या वादातून हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी आत्तापर्यंत पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, दोन अल्पवयीन मुलांचा यामध्ये समावेश आहे.
सीएच रजनीकांत, पोलिस उपायुक्त, परिमंडल चार