भाजपने राष्ट्रवादीला गंडवले ; समाविष्ट गावांमधील ‘एटीएमएस’ कागदावरच !

भाजपने राष्ट्रवादीला गंडवले ; समाविष्ट गावांमधील ‘एटीएमएस’ कागदावरच !

पुणे : शहरातील विविध 125 चौकांमध्ये एटीएमएस (ऍडॅप्टीव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम) सिग्नल यंत्रणा बसविण्यास प्रथम विरोध करणार्‍या राष्ट्रवादीने समाविष्ट गावात आणखी 100 चौकांमध्ये ही यंत्रणा बसविण्याच्या आश्वासनानंतर मुख्य सभेत भाजपला साथ दिली. मात्र, पावणेदोन वर्षे समाविष्ट गावांत एटीएमएस यंत्रणा बसविण्यासंदर्भात काहीच प्रक्रिया करण्यात आलेली नाही. समाविष्ट गावातील यंत्रणा अद्यापही कागदावरच राहिल्याने भूमिका बदलल्याने टीकेचा धनी ठरलेल्या राष्ट्रवादीला भाजपने गंडवल्याचे उजेडात आले आहे.
शहरातील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी पुणे स्मार्ट सिटीने एटीएमएस सिस्टिम बसविण्यासाठी 2018 मध्ये निविदा काढल्या होत्या.

पहिल्या टप्प्यात शहरातील 261 चौकांपैकी 125 चौकांमधील सिग्नल एकमेकांशी जोडून आधुनिक यंत्रणेने नियंत्रित करणे, गर्दीनुसार सिग्नलचे टायमिंग सेट करणे यासाठी ही यंत्रणा बसविण्याचे नियोजन केले होते. दरम्यान, 2019 मध्ये राज्यातील सरकार बदलले. स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये सर्व पक्षीय संचालकांनी 'गुपचूप' निविदा मंजूर केली. सुमारे 102 कोटी 62 लाख रुपयांचे हे काम नवी दिल्लीच्या कंपनीला देण्यात आले. पुढील पाच वर्षे ही यंत्रणा चालविणे व देखभाल दुरुस्ती करणे, यासाठी प्रतिवर्षी 11 कोटी 58 लाख असा एकूण 57 कोटी 94 लाख रुपये खर्चही येणार आहे.

स्मार्ट सिटीकडे पैसे नसल्याने हा खर्च महापालिकेने करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने मान्य केला. स्थायी समितीने मंजुरी दिल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या विरोधी पक्षांनी विरोध केला, या विरोधात आंदोलन केले, फेरविचाराचा प्रस्तावही दिला. राज्य शासनाकडे व ईडीकडे तक्रार करण्याचा इशाराही दिला. मात्र, हा विषय 23 नोव्हेंबर 2021 रोजी मुख्य सभेत मंजुरीसाठी आल्यानंतर सुरुवातीस विरोध करणार्‍या राष्ट्रवादीने सत्ताधारी भाजपला मदतीचा हात देत प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले.

ऐनवेळी भूमिका बदलण्याचे कारण सांगताना राष्ट्रवादीचे नेते म्हणाले होते की, मूळ प्रस्ताव शहरातील 125 चौकांमध्ये एटीएमएस यंत्रणा बसविण्याचा होता. आता उपसूचना देऊन समाविष्ट गावांमधील आणखी 100 चौकांमध्ये ही यंत्रणा बसविण्याचा निर्णय झाल्याने आम्ही पाठिंबा दिला आहे. उपसूचनेसह प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

मूळ प्रस्तावातील 125 चौकांपैकी 113 चौकांध्ये एटीएमएस सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली आहे. मात्र, उपसूचनेनुसार समाविष्ट गावांमधील 100 चौकांमध्ये ही यंत्रणा बसविण्याची प्रक्रिया एक टेबलही पुढे सरकलेली नाही. या संदर्भात एटीएमएस यंत्रणा बसविणार्‍या स्मार्ट सिटीच्या अधिकार्‍यांकडे विचारणा केली असता, त्यांना समाविष्ट गावातील एटीएमएसबाबत काहीही कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले. उपसूचनेद्वारे चौकांची संख्या वाढवल्याचे माहिती नसल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. त्यामुळे समाविष्ट गावांतील चौकांमध्ये एटीएमएस यंत्रणा बसविण्याचे आश्वासन मूळ प्रस्तावाला मंजुरी घेण्यासाठी जुमला तर नव्हता ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बारा चौकांमध्ये जागेची अडचण

शहरातील 125 चौकांपैकी 113 चौकांध्ये एटीएमएस यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात बसविलेल्या 30 चौकातील यंत्रणा पूर्ण क्षमतेने सुरू असून, त्याची चाचणीही यशस्वी झाली आहे. उर्वरित चौकांमधील यंत्रणेची चाचणी सुरू आहे. तर 12 चौकांमधील यंत्रणा जागेअभावी बसवण्याचे काम थांबल्याचे स्मार्ट सिटीच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news