भारत-पाकिस्तान आज पुन्हा भिडणार | पुढारी

भारत-पाकिस्तान आज पुन्हा भिडणार

कोलंबो : वृत्तसंस्था आशिया चषक 2023 स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुपर-4 फेरीचा सामना रविवारी (दि.10) होत आहेे. प्राथमिक फेरीतील सामना पावसात वाहून गेल्यानंतर या सामन्याबद्दल चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. मात्र, आज पुन्हा एकदा पावसाची भूमिका महत्त्वाची असू शकते. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार 90 टक्के पाऊस येणार आहे. त्यामुळे चाहते निराश होऊ शकतात, पण खराब हवामानामुळे आशियाई क्रिकेट परिषदेला 10 सप्टेंबर रोजी होणार्‍या भारत-पाकिस्तान सामन्यासाठी राखीव दिवस ठेवावा लागला. भारताकडून या सामन्यात दोन बदल केले जाण्याची शक्यता आहे.

कर्णधार रोहित शर्मा प्लेईंग-11 मध्ये दोन मोठे बदल करू शकतो. श्रेयस अय्यर आणि मोहम्मद शमी या दोन खेळाडूंना वगळले जाऊ शकते. श्रेयस अय्यरचे संघातून बाहेर पडणे जवळपास निश्चित आहे. कारण, पहिल्या सामन्यात अय्यरला विशेष काही करता आले नाही. तसेच अनेक महिन्यांनंतर के.एल. राहुल संघात पुनरागमन करू शकतो. के.एल. राहुलला वर्ल्डकप 2023 च्या संघात संधी मिळाली आहे. त्यामुळे बीसीसीआयसह निवडकर्त्यांना केएल राहुलला जास्तीत जास्त संधी द्यायची आहे. त्याच्याऐवजी इशान किशन संघात आला होता; परंतु इशानने मागील चार वन डे सामन्यांत 52, 55, 77 व 82 धावा केल्या. पाकिस्तानविरुद्ध जिथे भारताचे आघाडीचे 4 फलंदाज अपयशी ठरले, तिथे इशानने 82 धावा करून हार्दिकसह डाव सावरला. अशात राहुलच्या पुनरागमनानंतर इशानला बाहेर करणे योग्य ठरणार नाही. याशिवाय इतक्या मोठ्या सामन्यात राहुलला यष्टिरक्षणाची जबाबदारी देणे धोक्याचे ठरू शकत असल्यामुळे इशानचे संघातील यष्टिरक्षक फलंदाज म्हणून स्थान अबाधित राहिले, तर त्याच्याऐवजी श्रेयस अय्यर बाहेर होऊ शकतो.

काही दिवसांपूर्वी बुमराह ‘बाप माणूस’ बनला होता, त्यासाठी तो भारतात परतला होता. त्यामुळे नेपाळसोबतच्या सामन्यात बुमराहऐवजी शमीची संघात निवड करण्यात आली होती, पण आता बुमराह पुन्हा संघात सामील झाला आहे. त्यामुळे संघाच्या प्लेईंग 11 मध्ये त्याचे पुनरागमन निश्चित आहे. पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघ अतिरिक्त फिरकीपटूंसह मैदानावर उतरू शकतो. अशात एक जलदगती गोलंदाजाला बाहेर बसावे लागेल हे निश्चित. हार्दिक पंड्या हा जलदगती गोलंदाजीचा पर्याय असल्याने शमीला उद्या पुन्हा बाकावर बसवले जाऊ शकते.

संभाव्य प्लेईंग इलेव्हन ः

भारत :रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर/लोकेश राहुल, इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी/अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

पाकिस्तान : फखर झमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टिरक्षक), आगा सलमान, इफ्तिकार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, शाहिन आफ्रिदी, हॅरिस रौफ.

Back to top button