मुंबई; पुढारी वृत्तसेवा : हॅलो, मला नात्याचा कंटाळा आला आहे…मला झोप नाही लागत…मला नोकरीमुळे डिप्रेशन आलंय… आर्थिक विवंचनेमुळे आत्महत्येचा विचार येत आहे… अशा नानाविध समस्याग्रस्त नागरिक शासनाच्या टेलिमानस हेल्पलाईनवर फोन करत आहेत. राज्यातील विविध शहरांतून दररोज ९३ लोक या हेल्पलाइनवर कॉल करून त्यांच्या मानसिक आरोग्याच्या समस्यांवर उपाय शोधत आहेत. गेल्या ९ महिन्यांत या हेल्पलाईनवर २५ हजार लोकांनी आपल्या व्यथा मांडल्या आहेत. सर्वाधिक कॉल्स हे कोल्हापूर शहरातून येत असल्याची माहिती समोर आली आहे.
मानसिक आजार ही एक मोठी आरोग्य समस्या झाली आहे. विभक्त कुटुंब पद्धती, कामाचा वाढता ताण, बदललेली जीवनशैली, आर्थिक समस्यांमुळे आणि एकटेपणामुळे, अतिविचार करून मानसिक आजाराला बळी पडत आहेत. याची गांभीर्याने दखल घेत, प्रत्येकाने मनमोकळेपणाने संवाद साधावा आणि सल्लामसलत करून योग्य निदान व उपचार मिळावेत यासाठी राज्य सरकारने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात टेलिमानस हेल्पलाईन क्रमांक सुरू केला आहे. या हेल्पलाइनवर नऊ महिन्यांत २५ हजारांहून अधिक कॉल आले आहेत. या हेल्पलाईनवर दररोज ९० ते ९५ कॉल्स येतात. आतापर्यंत टेलिमनसच्या १४१४१ या हेल्पलाइन क्रमांकावर २५ हजारांहून अधिक कॉल्स आले आहेत.
राज्याच्या मानसिक आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले की, कोणत्याही भाषेतील व्यक्ती या हेल्पलाईन नंबरवर कोणत्याही समस्येसाठी मोफत सल्ला घेऊ शकतात. या हेल्पलाईनवर मानसोपचार तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाते.
झोप न लागणे, भविष्याचे काय होणार, लग्नातील अडथळे, त्यामुळे येणारे नैराश्य, नातेसंबंध, तणाव, भीती, अतिराग, नोकरी न मिळाल्याने आलेले नैराश्य.
हेही वाचा :