

लोणी-धामणी: आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात मे महिन्यापासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने विहिरी, नाले व ओढ्यांमध्ये मुबलक पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे या भागातील बागायत तसेच जिरायती क्षेत्रात पाण्याची परिस्थिती समाधानकारक असून, कांदा लागवडीला वेग आला आहे.
लाखणगाव, लोणी, धामणी, जारकरवाडी, पोंदेवाडी, निरगुडसर परिसरात सध्या शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा लागवड करत आहेत. मात्र, गेल्या महिन्यापासून सतत बदलणाऱ्या हवामानामुळे कांद्याची रोपे खराब झाल्याने रोपांचे दर वाढले आहेत.
दरवर्षी लोणी व धामणी परिसरात शेतकरी पाण्याचा अंदाज घेऊनच कांदा लागवड करतात. कारण योग्य नियोजन न केल्यास काढणीच्या काळात पाण्याची टंचाई भासू शकते. त्यामुळे साधारणतः ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात कांदा लागवड केली जाते. कांदा सरासरी तीन ते साडेतीन महिन्यांत काढणीला येत असल्याने या कालावधीत पाण्याची कमतरता भासत नाही.
सध्या कांदा लागवडीचा योग्य हंगाम असल्याने सर्वच शेतकरी शेतकामात व्यस्त आहेत. त्यामुळे लागवडीसाठी मजूर मिळणे कठीण झाले असून अनेक शेतकरी ’सावड पद्धती’चा अवलंब करत आहेत. अन्यथा मंचर, नारायणगाव, खेड येथून मजूर आणावे लागतात. त्यासाठी दोन वेळचे जेवण व दिवसभराचा रोजगार द्यावा लागतो, ज्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक भार वाढतो.
आता लागवड केलेल्या कांद्याला भविष्यात चांगला बाजारभाव मिळाल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते. मात्र, सध्या कांद्याच्या दरात चढ-उतार होत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.