पुणे : पुढारी वृत्तसेवा
मुळा- मुठा नदी सुधारणांच्या जायका प्रकल्पाला अखेर अंतिम मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे सात वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आता खऱ्या अर्थाने नद्या प्रदूषण मुक्त करण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 6 मार्चच्या नियोजित पुणे दौऱ्यात या प्रकल्पाच्या भूमीपूजनाचा नारळ फुटण्याची शक्यता आहे.
शहरात तयार होणाऱ्या मैला पाण्यावर शंभर टक्के प्रक्रिया करून, मध्य भागांतून वाहणाऱ्या मुळा- मूळा नद्या प्रदूषण मुक्त करण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय नदी सुधारणा प्रकल्पातंर्गत जपानच्या जायका कंपनी मार्फत तब्बल 990 कोटींचे अनुदान 2015 मध्ये मंजूर केले आहे. या प्रकल्पाअंतर्गत नव्याने 11 मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या मैला वाहिन्या टाकण्यात येणार आहेत. मात्र, सल्लागार नेमण्यापासून टप्या निहाय काढण्यात आलेल्या वाढीव दराच्या निविदा, त्या पुन्हा रद्द करून नव्याने निविदा काढणे, त्यानंतर कोरोनाची साथ या सर्व कारणांमुळे हा प्रकल्प सात वर्षे रेंगाळला.
दरम्यान, पुन्हा नव्याने खर्चाचा सुधारीत आराखडा प्रशासनाने केला होता. त्यानुसार 1 हजार 231 कोटी सह देखभाल दुरुस्तीचा दोनशे ते अडीचशे कोटींच्या सुधारीस खर्चास स्थायी समितीने मंजुरी दिली होती. त्यानुसार प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबवून अंतिम मंजुरीसाठी जायका कंपनीकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला होता. त्यावर सोमवारी जायकाने मंजुरीचा शिक्का मोर्तब केला असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. त्यामुळे आता खऱ्या नद्या प्रदूषण मुक्त करण्याचा कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
पुणे शहराची ओळख असलेल्या मुळा- मुठा नद्या प्रदूषण मुक्त करण्यासाठी जायकाचा प्रकल्प महत्वकांक्षी ठरणार आहे. स्थायी समिती अध्यक्ष असताना आणि त्यानंतर महापौर पदाच्या कार्यकाळात या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्याला यश मिळाले आहे.
– मुरलीधर मोहोळ, महापौर पुणे.