हिंगोली : फेसबुक पोस्ट लिहून माजी खासदाराचा शिवसेनेला घरचा आहेर | पुढारी

हिंगोली : फेसबुक पोस्ट लिहून माजी खासदाराचा शिवसेनेला घरचा आहेर

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : संजय राऊत आणि नारायन राणे यांच्यात सूरु असलेल्या शाब्दिक वादामध्ये आता सेनेच्या हिंगोलीच्या माजी खासदार शिवजी माने यांनी फेसबुक पोस्ट लिहून सेनेला घरचा आहेर दिला आहे. माजी खासदार माने यांनी केलेली फेसबुक पोस्ट सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे.

ईडीचा घोटाळा जरूर काढा परंतु राज्यसभेत व लोकसभेत जनतेचे प्रश्न मांडा. ईडीच काय वाकड होणार आहे हे ही आम्हाला माहीत आहे. आजपर्यंत अधिका-यांचे काय झाल ते आता होणार? हे सर्वांनाच माहीत आहे. ही नवीन समाजकारणाची पध्दती पहावयास मिळते आहे. जे सुडाचे राजकारण सुरू आहे. पण आम्ही कुणाशी भांडत आहोत हे ही हे लोक विसरले आहेत.

दरम्‍यान, यामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी रिंगणाच्या बाहेरून या सर्वांची मजा घेत आहे. अजित पवार वगळता या विषयावर कुणी भाष्य केले नाही असे ऐकण्यास किंवा वाचण्यात येणार नाही. यांना गोर- गरीबांचे प्रश्न बाजूला ठेवून हे सर्व एकमेकांची ओढाओढी करत आहेत. अश्याने काय साध्य होणार आहे? संपुर्ण महाराष्ट्राला माहीती आहे कुणी किती कष्टाने कमाई केली आहे?.

संजय राऊत कोण होते, त्यांचा पगार किती होता, तसेच नारायण राणेंचे व्यवसाय कोणते आहेत? आणि राणे आता एवढ्या उशिरा खुनी दिसू लागले आहेत? त्यांना मुख्यमंत्रीपदी बसविले होते, त्यावेळी ते काय धुतल्या तांदळासारखे होते का? साहेबांना संरक्षण देण्यासाठी त्यांनीच त्याच्या जिवाची पर्वा केली नव्हती हे विसरले का? मुबंईत जी शिवसेना वाढली ज्यांत मोजून काही मंडळी होती, त्यांत राणे होतेच ना. आता शिळ्या कढीला ऊत काय आणणे सुरू आहे, दत्ता सामंतापासून हत्येचा शोध घेत बसणार आहे का? कोण कोण गुन्हेगार आहे आणि गुन्हा करण्यास कोणी कोणी कोणाला मदत केली ते सर्व बाहेर येईल.

तसेच, शेवटी सर्वच जण शिवसैनिकांच्या जीवावर मोठे झाले आहेत, हे कोणी विसरू नये आणि विसरून चालणार नाही. हे मात्र नक्की. एक गोष्ट कोणीही विसरू नये मुबंईला वाचविणारी मंडळीच आता आपआपसात भिडते आहे व ती कशी संपेल याचीच वाट काँग्रेस पहात आहे, अशी ही फेसबुक पोस्ट आहे.

हे ही वाचलं का  

Back to top button