

पुणे : ‘दिल्लीत बसलेला एक जादूगार लोकशाहीला कमकुवत करीत आहे. त्यांच्या धोरणांमुळे दोन पिढ्या बरबाद झाल्या असून, 25 टक्के तरुणांना योग्य शिक्षण आणि रोजगारापासून वंचित राहावे लागत आहे. लोकसंख्येच्या लाभांशाचे वरदान संपेल आणि या पिढ्या म्हाताऱ्या होतील तेव्हा यामुळे काय नुकसान झाले हे समजेल,’ अशी टीका एमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केली.(Latest Pune News)
पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे बुधवारी एमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या चर्चासत्राचे आयोजन केले होते. या वेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष बिजमोहन पाटील व सरचिटणीस मंगेश फल्ले उपस्थित होते.
ओवैसी म्हणाले, सध्या विद्यार्थिदशेत असलेल्या युवकांना गोरक्षक बनविले जात आहे, एका धर्माविरोधात भडकविले जात आहे. मात्र, आपले खरे शत्रू हे मुस्लिम नाहीत. हे त्यांच्या लक्षात येत नाही. गोरक्षणाच्या नावावर मुस्लिम समाजाला लक्ष्य केले जात आहे.
ओवैसी म्हणाले, ’मुस्लिम सर्व क्षेत्रांत मागे आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मागासवर्गीयांना शिक्षणप्रवाहात आणून समानता द्यावी, असे सांगितले होते; पण आज कोणताही पक्ष त्याकडे लक्ष देत नाही.
भारताला दोन आघाड्यांवर युद्धाचा धोका
राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात ओवैसी यांनी पाकिस्तान व चीनचा उल्लेख करताना सांगितले की, ‘पाकिस्तानची लष्करधार्जिणी व्यवस्था भारतासाठी सतत धोका निर्माण करणारी आहे. भारताचे शेजारी नेपाळ, श्रीलंका, बांगलादेशात सरकारविरोधी आंदोलने झाली तेथील सत्ता उलथविण्यात आली. मात्र, याची कल्पना देखील सरकारला नव्हती. हे सर्व देश चीनकडे झुकत आहेत, तरी केंद्र सरकार योग्य धोरण आखत नाही, असेही ओवैसी म्हणाले.
पाकिस्तानला धडा शिकवण्याची संधी घालवली
पुलवामाचा हल्ला, पहलगामचा हल्ला कसा झाला? आपल्या निष्पाप नागरिकांवर हल्ला करण्यासाठी एवढी सुरक्षाव्यवस्था असताना दहशतवादी आत आलेच कसे? हा प्रश्न कोणी विचारत नाही आणि उत्तरही कोणी देत नाही. पहलगाम हल्ल्यानंतर ’ऑपरेशन सिंदूर’मध्ये आपल्याला पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवण्याची संधी होती. पाकला अद्दल घडवावी, अशी संपूर्ण देशाची भावना होती. मात्र, आपण अचानक शस्त्रसंधी का केली? असा सवाल करीत अशी संधी पुन:पुन्हा येत नाही आणि आपण ती घालवली.