

पुणे : आजारी व्यक्ती त्याला होत असलेला त्रास डॉक्टरांना सांगू शकतो. परंतु, मृतदेहावर अन्याय झालेला तो सांगू शकत नाही. मात्र, हा मृतदेह देखील त्याच्या अंगावरील जखमा, वण, विषबाधेमुळे होणारे बदल यावरून एकप्रकारे बोलतच असतो. ती भाषा एका न्यायवैद्यकतज्ज्ञालाच कळते, हे मी एमबीबीएस करत असतानाच लक्षात आले होते. तेव्हाच आव्हानात्मक असणाऱ्या न्यायवैद्यकशास्त्र विभागात पदव्युत्तर पदवी एमडीफ अभ्यासक्र करायचे ठरविले.(Latest Pune News)
येथे कार्यरत असतानाच एक खूनही मला उघडकीस आणता आला. सुरुवातीला घरून विरोध झाला, पण आता त्यांना माझे कौतुक वाटते. मुलींनी या शाखेत यायला हवे... या भावना आहेत मुळची केरळची व सध्या ससून रुग्णालयाच्या न्यायवैद्यक विभागात पदव्युत्तर पदवी (एमडी) च्या द्वितीय वर्षाला शिकणारी सौभाग्या पी. कुमार हिच्या!
मृतदेहाचे शवविच्छेदन हा पुरूषांची मक्तेदारी असलेला वैद्यकीय विभाग आहे. परंतु, आता मुलींनीही या विभागात स्वत:ला सिद्ध केले आहे. शवविच्छेदन करायचे असल्यास न्यायवैद्यकशास्त्र विभागात पदव्युत्तर पदवी असावी लागते. ससून रुग्णालयात यासाठी सध्या 6 जागा आहेत. त्यापैकी चार जणी महिला आहेत. त्या पुरूष डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून आत्मविश्वासाने व निर्भयपणे मृतदेहाचे शवविच्छेदन करत आहेत. ससूनच्या इतिहासात प्रथमच एका वेळी चार महिला डॉक्टर या विभागात कार्यरत आहेत.
सौभाग्यासोबतच तिची सहकारी असलेली मुळची पंजाब येथीर रीना सहारिया सांगते, मी रशियामध्ये एमबीबीएस केल्यावर आर्मी मेडिकल कॉर्प्स येथे 2016 ते 2024 दरम्यान वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा बजावली. पुढे आणखी शिकायची इच्छा होती. ही शाखा कायदा, न्याय, व तपास याभोवती फिरत असल्याने मी न्यायवैद्यकशास्त्र निवडले. या शाखेत सर्वोत्तम काम करणारे ससून रुग्णालय हे देशात नामांकित असल्याने येथेच प्रवेश निश्चित केला. येथे खून, अपघात, विषबाधा, जळित, कुजलेल्या असे वेगवेगळे मृतदेह येतात. त्यांच्या शवविच्छेदनाची आता सवय झाली आहे. माझ्या ड्युटीमध्ये रोज 10 ते 12 मृतदेहांचे मी शवविच्छेदन करते.फफ
मुळची बुलढाण्याची मराठमोळी डॉ. जागृती निकम ही तिसऱ्या वर्षाला आहे. तिने एमबीबीएस करतानाच या विषयात रस घेतला अन् ही शाखा निश्चित केली. ती म्हणते, त्यावेळी घरचे म्हणाले होते की हा प्रांत पुरूषांचा आहे. मात्र, माझा विचार पक्का होता. आता वडीलच अभिमानाने माझे नाव घेतात. येथे फक्त थिअरीचे धडे मिळत नाहीत तर प्रचंड प्रॅक्टिस करायला मिळते. आता कोणतीही भीती वाटत नाही.
न्यायवैद्यकशास्त्र शाखेमध्ये पूर्वी मुली येत नसत. मात्र, आता त्या स्वतःहून येत आहेत ही बाब कौतुकास्पद आहे. या सर्वजणी आत्मविश्वासाने जबाबदारी पेलत आहेत. मुली असल्यामुळे आम्हाला केवळ शवविच्छेदनच नव्हे तर रुग्णालयात भरती झालेल्या लैंगिक अत्याचारग््रास्त महिलांची तपासणी, त्यांचे वयाची तपासणी आदीबाबत खूप मदत होते. महिला रुग्ण त्यांच्याजवळ मनमोकळेपणाने व्यक्त होतात.
डॉ. विजय जाधव, विभागप्रमुख, न्यायवैद्यक व विषशास्त्र विभाग, ससून रुग्णालय