

परिंचे : श्रीक्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथे अष्टमीला मंगळवारी (दि. 30) श्रीनाथांच्या भक्तभेटीचा सोहळा रंगला होता. नवरात्रोत्सवानिमित्त अष्टमीला सकाळी श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी यांना रिठ्याच्या पानांची आलंकारिक पूजा करण्यात आली. त्यानंतर दुपारी 12 वाजता देवाच्या पालखीच्या वस्त्र परिधान केलेल्या मानाच्या काठ्यांसह श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांची पालखी भक्त कमळाजीभेटीला माळावर गेली. या वेळी सर्व भाविकभक्त, दागिनदार, ग्रामस्थ लवाजमा होता. तेथे श्रीनाथांची पालखी काठ्या, ढोल-नगाराच्या आवाजात भक्त कमळाजी मंदिर येथे भेटा-भेट झाली. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.(Latest Pune News)
मंगळवारी पहाटे पूजा होऊन मंदिराचा मुख्य गाभारा बंद करण्यात आला. सकाळी 6 वाजता मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. श्रीनाथ-जोगेश्वरी यांना रिठ्याच्या पानांची आलंकारिक पूजा घातल्यामुळे श्रीनाथांचे रूप उजळून आले होते. फुलमाळी यांनी रिठ्याच्या पानांची व्यवस्था केली होती. सोनार दीक्षित परिवार, गुरव मंडळींनी अलंकार सजविला. सायंकाळी नेताजीआबा धुमाळ (वाडकर) यांच्यामार्फत मानाचा साडीवाटपाचा कार्यक्रम होतो. अनेक रिवाज हे पूर्वापार चालत आले असून, पुढेही चालविले जात आहेत.
दुपारी 12 वाजता धुपारती होऊन फुलांनी सजलेल्या पालखीत श्रीनाथ म्हस्कोबा व देवी जोगेश्वरी यांच्या उत्सवमूर्ती पालखीत ठेवून पालखीची छबिन्यासह एक मंदिरप्रदक्षिणा पूर्ण करून पालखी भक्तभेटीसाठी कमळाजी मंदिर माळावर गेली होती. देऊळवाड्यातून पालखी बाहेर जाताना पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. या वेळी वस्त्र परिधान केलेल्या मानाच्या काठ्यांच्या फुलांसह रंगबिरंगी फुगे बांधून सजावट केलेल्या काठ्या पालखीपुढे उपस्थित होत्या.
परंपरेचे दर्शन
श्रीक्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर हे आपल्या परंपरा व संस्कृतीचे नेहमीच दर्शन घडवत आलेले आहेत. यामुळे सर्व विधी व नवरात्रोत्सवातील समाजमान्य चालीरीती, प्रथा, परंपरा अविरत चालाव्यात, यासाठी विश्वस्त मंडळ सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे देवस्थान ट्रस्टमार्फत अध्यक्ष राजेंद्र धुमाळ यांनी सांगितले.