पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.
या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची डिजिलॉकरमध्ये निकाल पत्रिका उपलब्ध व्हावी, यासाठी अपार आयडी नोंदणी करणे आवश्यक आहे. सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा अपार आयडी उपलब्ध करून त्याची नोंद राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर करावी, अशा सूचना राज्य मंडळाचे सचिव दीपक माळी यांनी दिल्या आहेत.
केंद्र शासनाने प्रत्येक विद्यार्थ्यांचा अपार आयडी तयार करावा असे निर्देश राज्याच्या शालेय शिक्षण विभागाला दिले होते. त्यानुसार गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांचा अपार आयडी तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. राज्य मंडळाच्या इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका डिजिलॉकरमध्ये उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
डिजीलॉकरमुळे विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांचे कायमस्वरूपी डिजिटल रेकॉर्ड तयार होऊन सर्व शैक्षणिक गुणपत्रिका एकत्रित उपलब्ध होतात. वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुलभ होते. शैक्षणिक संस्था त्वरित पात्रता पडताळणी करू शकतात. तसेच कागदपत्रांच्या हार्ड कॉपी सादर करायची आवश्यकता नाहीशी होते. सरकारी शिष्यवृत्ती व योजनांमध्ये लाभ मिळणे सुलभ होते.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नोंदी कुठूनही उपलब्ध होतात. केंद्रीकृत आणि सुरक्षित प्रणालीमुळे कागदपत्रे हरवण्याचा धोका राहत नाही. त्यामुळे सर्व शाळा कनिष्ठ महाविद्यालयांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा अपार आयडी उपलब्ध करून त्याची नोंद राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर करावी. त्याचप्रमाणे केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य मंडळाकडे सादर करावा असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.