

पारगाव: आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात शेतकऱ्यांनी घेतलेल्या केळी पिकावर कडाक्याच्या थंडीचा परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी केळीच्या बागांची विशेष काळजी घेताना दिसत आहेत. रांजणी परिसरात अनेक शेतकऱ्यांनी केळीच्या बागेतील घडांवर स्कर्टिंग बॅगा लावल्या आहेत.
गेल्या चार-पाच वर्षांपासून तालुक्याच्या पूर्व भागातील रांजणी, नागापूर, पारगाव आदी गावांमध्ये केळीचे क्षेत्र झपाट्याने वाढले आहे. सद्यस्थितीत जवळपास सद्यस्थितीत जवळपास पाचशेहून अधिक एकर क्षेत्रात केळीची लागवड झाल्याचे दिसत आहे.
रांजणी, नागापूर या गावांमध्ये केळीच्या भागांमध्ये केळीचे घड मोठ्या प्रमाणावर लगडल्याचे दिसत आहे. याच भागात थंडीचे प्रमाण अतिशय वाढले आहे. वाढत्या कडाक्याच्या थंडीचा परिणाम केळीच्या घडांवर होताना दिसत आहे.
डिसेंबर, जानेवारी या महिन्यांमध्ये थंडीचे प्रमाण अतिशय वाढते. थंडीचा परिणाम केळीच्या बागांवर होऊन चिलिंगचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. यामध्ये केळीचे झाड व लगडलेल्या घडांचे देखील नुकसान मोठ्या प्रमाणावर होते.
रांजणी, नागापूर परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी कडाक्याच्या थंडीपासून केळी पिकाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी घडांचे संरक्षण करण्यासाठी त्यावर स्कर्टिंग बॅगा लावल्या आहेत. यासाठी एकरी 12 हजार रुपये खर्च येत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होत असून अपेक्षित दर मिळण्याबाबत शेतकरी वर्गात शंका आहे.