

आळंदी: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी सोहळ्याचे आषाढी पायी वारीसाठी बुधवारी (दि. ८) सायंकाळी चार वाजता आळंदी येथून प्रस्थान होणार आहे. या पार्श्वभूमीवर आळंदीत जय्यत तयारी अंतिम टप्यात आली आहे.
आळंदी देवस्थान, आळंदी नगर परिषद व पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने आपल्या अखत्यारीत येणारी कामे मार्गी लावण्यास सुरुवात केली. पोलिस प्रशासनाने माउलींच्या मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला असून, येथे बंदोबस्त तैनात करणार आहे.
आळंदी देवस्थान व आळंदी नगरपरिषद यांच्याकडून भाविक, वारकऱ्यांना विविध सोयी, सुविधा पुरविण्यात येणार आहेत. यंदा आधुनिक मंडप व धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन भाविकांसाठी असणार आहे. आळंदी येथून बुधवारी सायंकाळी ४ वाजता श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रस्थान ठेवेल. रात्री आळंदीतच आजोळघरी गांधीवाडा दर्शनबारी मंडपात मुक्कामी राहील.
गुरुवारी (दि. ९) सकाळी आळंदीतून मार्गस्थ होईल व सायंकाळी पुण्यात मुक्कामी राहील. शुक्रवारी (दि.१०) देखील पालखी पुण्यातच भवानी पेठ विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मुक्कामी असेल, तर दि. ११ व १२ जुलै रोजी सासवड येथे दोन दिवस मुक्कामी असेल. त्यानंतर सोमवारी (दि. १३ ) जेजुरी, मंगळवारी वाल्हे, बुधवारी लोणंद व रविवारी (दि. १६) तरडगाव येथे पालखी मुक्कामी राहील.
लोणंद येथे बुधवारी दुपारी माऊलींचे निरास्नान पार पडेल. दि. १७ रोजी फलटण, दि. १८ रोजी बरड, दि. १९ जुलैला नातेपुते, दि. २० जुलैला माळशिरस, मंगळवारी (दि. २१) वेळापूर, बुधवारी (दि. २२) भंडीशेगाव, गुरुवारी (दि. २३) वाखरी, तर शुक्रवारी (दि. २४) हा सोहळा श्रीक्षेत्र पंढरपूर मुक्कामी पोहोचेल. शनिवारी (दि. २५) आषाढी एकादशीचा महासोहळा होणार आहे. बुधवारी (दि. २९) पालखीचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे.