

पुणे: ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयातील अकरा सिव्हिल, अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांची निवड जपानमधील नामांकित टाकामात्सु कन्स्ट्रक्शन ग््रुाप या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीमध्ये झाली आहे. पहिल्यांदाच टाकामात्सु कन्स्ट्रक्शन ग््रुाप, जपानमध्ये भारतीय संस्थेसोबतच्या सहयोगातून प्रारंभिक तुकडीची भरती करण्यात आली आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये अपूर्वा मुर्कुटे, अदिती नलावडे, सानिका पवार, आयुष परब, अदिनाथ गवदसे, प्रणव तेर्डाळ, आदित्य पाडुळे, ऋषिकेश परदेशी, राजवर्धन पवार, धुव सबडे आणि अथर्व काळे यांचा समावेश आहे. या निवडीमुळे संस्थेचे सचिव मालोजीराजे छत्रपती (एआयएसएसएम सोसायटी) यांनी विद्यार्थ्यांचे आणि प्राध्यापकांचे अभिनंदन केले, तसेच विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या महाविद्यालयाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे कौतुक केले.
प्राचार्य डॉ. डी. एस. बोरमणे यांनी या यशाचे श्रेय वर्षभर राबविण्यात येणाऱ्या स्टुडन्ट्स क्लबच्या उपक्रमांना आणि महाविद्यालयाच्या अखंड पाठबळाला दिले, जे उत्कृष्टता व व्यावसायिक प्रगतीसाठी प्रेरक ठरते.
प्रशिक्षण व रोजगार अधिकारी रुतविज जाधव आणि सहायक अधिष्ठाता डॉ. शिल्पी भुइंया यांनी या आंतरराष्ट्रीय भरती प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली व टाकामात्सु कन्स्ट्रक्शन ग््रुापशी समन्वय साधून संपूर्ण प्रक्रिया सुरळीत रितीने पार पाडली. सिव्हिल अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. पी. बी. नांगरें यांनी विद्यार्थ्यांच्या या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल निष्ठा, शिस्तबद्धतेची व परिश्रमशीलतेची प्रशंसा केली.
महाविद्यालयाने डॉ. एस. एच. वानखडे, अधिष्ठाता - आंतरराष्ट्रीय संबंध यांच्या मोलाच्या योगदानाचेही कौतुक केले. त्यांनी विद्यार्थ्यांना जागतिक उद्योगांशी संलग्न होण्यासाठी उपयुक्त सहकार्य व संधी उपलब्ध करून दिल्या.