

धायरी: मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर नऱ्हे परिसरात वाढत चाललेल्या अपघातांच्या मालिकेमुळे निष्पाप लोकांचे जात असलेल्या बळींमुळे येथील सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाविरोधात नवले पुलाजवळ बोंबाबोंब व ‘तिरडी आंदोलन’ करून प्रशासनाचा निषेध करण्यात आला. या वेळी अंत्ययात्रा आणि अंत्यविधीचे प्रतीकात्मक आयोजन करून नागरिकांसह त्यांनी शासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, अपघातात लहान मुलीसह कुटुंबाची झालेली होरपळ पाहून मोरे भावुक होऊन म्हणाले, या भागात मृत्यूंची मालिका सुरू आहे. प्रशासन काहीच करत नाही. असेच चालू राहिले तर लोकांना जगण्यापेक्षा आत्महत्या करावीशी वाटेल, नऱ्हे-धायरी-वडगाव आणि आसपासचे नागरिकही भीतीच्या सावटाखाली आहेत. या वेळी मोठ्या संख्येने आंदोलनात नागरिक सहभागी झाले होते.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना आंदोलनादरम्यान भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत, प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना कराव्यात, रस्त्यांची पाहणी करून कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली.
या आंदोलनात राजाभाऊ जाधव, विठ्ठल सूर्यवंशी, हरीश वैद्य, लतिफ शेख, प्रशिक दारुंडे, सुनील पढेर, महेश गाडगे, सुशील भागवत, आनंद थेऊरकर, सुदर्शन देशमाने, सोनाली नायर यांसह अनेक नागरिक उपस्थित होते.
शासनाचे अधिकारी पाहणी करून जातात, आश्वासने देतात. पण बदल काहीच होत नाही. आमचे जीव गेले तरी प्रशासन जागे होत नाही. तुम्ही केलेल्या मदतीने ते जीव पुन्हा येणार नाहीत.
भूपेंद्र मोरे, सामाजिक कार्यकर्ते, नऱ्हे